मुणगेत येणाऱ्यांनो, आधी हे नियम वाचा!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

पाच पेक्षा जास्त लोक रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व ग्रामपचायतीकडून 1000 रुपये दंड करण्यात येईल.

मुणगे (सिंधुदुर्ग) - गणेश चतुर्थीसाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्ती किंवा ग्रामस्थांनी 7 ऑगस्टपूर्वी गावात येऊन 14 दिवस होम किंवा संस्थात्मक क्वारंटाईन रहाणे बंधनकारक असल्याचे ग्रामपंचायतीचे सरपंच अस्मिता पेडणेकर व ग्रामसेविका प्रीती ठोंबरे यांनी जाहीर केले आहे. 

गणेशोत्सव जवळ येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुणगे ग्रामपंचायतीच्या वतीने परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्ती किंवा ग्रामस्थांनी कोरोना विषाणूच्या पाश्‍वभूमीवर सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीच्यावतीने नियमावली तयार करण्यात आली आहे. सरपंच अस्मिता पेडणेकर यांनी नियमावली जाहीर केली. त्या म्हणाल्या, ""7 ऑगस्टपूर्वी गावात येवून क्वारंटाईन होणे आवश्‍यक आहे.

गणेश चतुर्थी कालावधीमध्ये येणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी मास्क वापरने बंधनकारक असून मास्क न वापरता एखादी व्यक्ती गावात फिरताना आढळल्यास 500 रूपये दंड आकारण्यात येईल. गणेशोत्सव कालावधीत गावतील भजनी मंडळानी भजनासाठी किंवा आरतीसाठी बाहेरगावी व दुसऱ्या गावातील भजनी मंडळाना गावात येण्यास सक्त मनाई आहे. तसे आठळल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पाच पेक्षा जास्त लोक रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व ग्रामपचायतीकडून 1000 रुपये दंड करण्यात येईल.

मूर्ती आगमनाचे वेळी व विसर्जनावेळी एका गणपती सोबत कुटुंबातील फक्त दोनच व्यक्ती राहतील व त्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक आहे. विसर्जनावेळी मिरवणूक व मनोरंजन साधने टाळावीत. नातेवाईक व मित्रमंडळी व इतर जिल्ह्यातील मंडळीना गावात येण्यास मनाई असून तसे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. माहेरवाशिणी व ग्रामस्थांना गावामध्ये 7 ऑगस्टपूर्वी दाखल होणे बंधनकारक आहे. 7 ऑगस्टनंतर क्वारंटाईन होण्याची व्यवस्था होऊ शकणार नाही. होम क्वारंटाईनचे नियम मोडणे, ई-पास शिवाय जिल्ह्यात प्रवेश करणे इत्यादी कारणासाठी 5 हजार रूपये दंड आकारण्यात येईल. 

गणेशोत्सवाबाबत सूचना 
गणेश चतुर्थी कालावधीत गावातील किंवा वाडीतील लोकांनी एकत्र येऊन भजन, आरती न करता प्रत्येकाने आपापल्या घरीच भजन व आरती करणे तसेच यावर्षी सत्यनारायण महापुजा, डबलबारी भजनाचे आयोजन करू नये. प्रत्येकाने आपल्या घरीच गणेशाचे पुजन करावे. इतरांच्या घरचे गणपतीचे दर्शन घेणे टाळावे. परजिल्ह्यातून गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी ग्रामस्थ समितीकडे नोंद करणे तसेच वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. या सर्व नियमाचे पालन गावपातळीवर कोरोना विरूद्ध लढण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे. यामध्ये शासन निर्णयाप्रमाणे वेळोवेळी बदलाची अंमलबजावणी होईल, यासाठी सर्वानी सहकार्य करावे.

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact konkan sindhudurg district