
जिल्हासह संपूर्ण राज्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करूनच व कर्मचारी वर्गाचे स्वॅब टेस्ट रिपोर्ट आल्यावरच शाळा सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले होते; मात्र संबंधित हायस्कूलचे मुख्याध्यापकांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट यायच्या आधीच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
माणगाव (सिंधुदुर्ग) - परिसरातील त्या हायस्कूलच्या शालेय व्यवस्थापनाच्या बेजाबदारपणामुळे मुलांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप करत मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित मुख्याध्यापक व संस्था प्रशासनावर कडक कारवाई करावी, संपूर्ण शाळा तत्काळ सील करावी, अशी मागणी युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी यांनी केली. आज संस्था व मुख्याध्यापकांना जाब विचारत संबंधित पालकांच्या शिष्टमंडळाने चांगलेच धारेवर धरले.
जिल्हासह संपूर्ण राज्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करूनच व कर्मचारी वर्गाचे स्वॅब टेस्ट रिपोर्ट आल्यावरच शाळा सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले होते; मात्र संबंधित हायस्कूलचे मुख्याध्यापकांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट यायच्या आधीच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिक्षकांनीही शाळा सुरू करण्याच्या आधी झालेल्या पालकांच्या बैठकीत सर्वांचे अहवाल येवू द्या, नंतरच शाळा सुरू करा, अशी मागणी केली होती; पण ही मागणी मुख्याध्यापकांनी धुडकावून लावली होती.
ही बाब आता समोर आली आहे; पण या सर्वांना बगल देत 23 पासून शाळा सुरू केली. यानंतर उच्च माध्यमिक विभागाच्या एका शिक्षकाचा रिपोर्ट गुरूवारी (ता.26) पॉझिटिव्ह आला. हा शिक्षक सोमवार ते गुरूवार असे चार दिवस शाळेत होता. त्यांनी अध्यापन केले होते; मात्र रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती मुख्याध्यापकांनी शिक्षक व पालकांपासून लपवून ठेवली. शुक्रवारी अचानक संध्याकाळी उशिरा विद्यार्थी वर्गाच्या व्हॉटसऍप ग्रुपवर सुटी घोषित केली. यात शनिवारी, रविवारी, सोमवारी गुरूनानक जयंतीची व मंगळवारी माणगाव जत्रोत्सवाची सुटी जाहीर केली; पण शनिवारी कोणती सुटी हे घोषित केले नाही. यानंतर पालकांना तो शिक्षक पॉझिटिव्ह आल्याची कुणकुण कालच सायंकाळी लागली. आज नेमकी कोणती सुटी दिली व तो शिक्षक पॉझिटिव्ह आढळूनही गप्प का? याचा जाब शिष्टमंडळाने विचारला.
शिष्टमंडळाच्या मागण्या
-संबंधित हायस्कूलच्या हलगर्जीपणामुळे धोका
- बेजाबदारपणामुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात
- संबंधित शिक्षक विद्यार्थ्यांच्या संपर्कात आल्याने चिंता
- पालकांकडूनीही केला संताप व्यक्त
- संपर्कातील शिक्षक, मुलांचे स्वॅब घ्यावेत
- संबंधिताच्या कुटुंबाचीही चाचणी घ्या
...तर जाब विचारणार
अन्यथा पालक व विद्यार्थी यांना एकत्र घेवून माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना घेराव घालून जाब विचारणार असल्याचा इशारा धुरी यांनी दिला. शाळा सील केल्यानंतर शिक्षकांना जबरदस्तीने शाळेत बोलावण्याच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी शिवराम केसरकर, माजी सरपंच बच्चाराम नाईक, भानू जुवेकर, ज्ञानेश्वर काणेकर आदी पालक उपस्थित होते.
संपादन - राहुल पाटील