चिंताजनक! ...तर आंबे फेकून देण्याचे वेळ

भूषण आरोसकर
शनिवार, 30 मे 2020

हापूसचे पिक नाही नाही म्हणता बऱ्यापैकी आल्याने मागणी पेक्षाही पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे अगदी कवडीमोल भावाने हापूस देण्याची वेळ विक्रेत्यांवर आली

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  हापूस आंब्याचा पुरवठा जास्त आणि मागणी कमी, अशी परिस्थिती झाल्याने अत्यंत कमी दराने आंबा विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे. या आठवड्यात 50 ते 100 रुपये डझन या दराने आंबा विक्री होत आहे. या आंबा पिकाला कोणत्याही प्रक्रिया उद्योगाचा आधार नसल्याने काजू बोंडुप्रमाणे शेवटच्या टप्प्यात आलेले आंबेही फेकून देण्याची वेळ बागायतदारांवर येण्याची शक्‍यता आहे. 

यंदा उशिराने आंब्याचे पीक आले. तरी त्याला सर्वांत जास्त फटका कोरोनामुळे बसला. आंब्याची निर्यात झाली नसल्याने ग्राहकांसाठी दारोदार आंबे विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे. आंब्याचा हंगाम सुरू होण्यापूर्वी अचानक अवकाळी पाऊस कोसळल्याने आंब्याला पुन्हा पालवी फुटून मोहर आला होता. यामुळे तब्बल दीड ते दोन महिन्यांनी हा कालावधी पुढे गेला होता. यामुळे यावर्षी आंबा पिक वाया जाणार असल्याची चिन्हे निर्माण झाली होती. यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये आंबा पिक बाजारात उपलब्ध झाले नाही.

त्यानंतर एकाच टप्प्यावर भरघोस उत्पन्न निघाल्याने आंबा पीक हळूहळू बाजारात न येता अचानक एप्रिलच्या नंतरच्या पंधरवड्यात आणि मेमध्ये दाखल झाला. त्यामुळे सुरुवातीला 400 ते 500 रुपये त्यानंतर 250 ते 300 रुपये डझन हापूस विक्री होऊ लागली. हा भाव विक्रेत्यांच्या दृष्टीने काहीसा समाधानकारक होता; मात्र अधिक काळपर्यंत हा दर टिकून राहिला नाही. उशिराने दाखल झालेला आंबा असलातरी अचानकरित्या भरघोस उत्पन्न आणि मोठ्या मार्केटअभावी अखेर दीडशे आणि शंभर रुपयाला प्रति डझनमागे आंबा विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली. परराज्यात व मोठ्या शहरातही हापूसला योग्य भाव मिळाला नाही. नागरिकांनीही कोरोनाची धास्ती घेतल्याने स्थानिक भागातच हापूस विक्री होऊ लागली. हापूसचे पिक नाही नाही म्हणता बऱ्यापैकी आल्याने मागणी पेक्षाही पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे अगदी कवडीमोल भावाने हापूस देण्याची वेळ विक्रेत्यांवर आली. 

पर्यटन रोडावल्याने परिणाम 
दरवर्षी उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यातील समुद्रकिनारी सुटीला लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. यावेळी हापुस आंबा विक्रेत्यांची बऱ्यापैकी आर्थिक चलती होते; मात्र यंदा कोरोनामुळे पर्यटनही ठप्प झाल्यामुळे 20 ते 25 टक्‍क्‍यांची विक्रीही रोडावली. कोरोनाच्या भीतीमुळे मालवाहतूकांची आंबा वाहतुकीस मानसिकताही फारशी दिसून आली. कॅनिंग उद्योगही धिम्या गतीने सुरू आहे. आंबावरही प्रक्रिया करणारे मोठे नाहीत. यंदा बोंडूसारखे आंबे फेकून देण्याची वेळ येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact mango sindhudurg district