सावंतवाडीत अधिक सतर्कता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

त्यांच्यासोबत प्रताधिकार सुशांत खांडेकर आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे आदीही दाखल झाले आहेत.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यात एकाच दिवशी तब्बल 2 स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सावंतवाडीवासीयांची चिंता वाढली असून आरोग्य यंत्रणाही अधिक सतर्क झाली आहे. हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. पालघर येथून 20 मेस ते गावी आले होते. आरोग्य विभागही तातडीने दाखल झाला असून पुढील कार्यवाही सुरू झाली आहे. 

तालुक्‍यात लॉकडाउनच्या 65 दिवसांत पहिल्यांदाच 2 रुग्ण आढळले. आरोग्य प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. आज मिळालेले दोन्ही पॉझिटिव्ह रुग्ण हे कारिवडे गावातील असून ते पालघर येथून 20 मेस कारिवडे कट्टा गावठणवाडी पूर्ण प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. शाळेतील 4 वर्ग खोल्यामध्ये एकूण 15 जण क्वारंटाईन होते. त्यामुळे त्यांचेही नमुने देखील तपासणीला पाठविण्यात येणार आहेत. या शाळेत क्वारंटाईन कक्षात असलेल्या एका तरुणीच्या क्वारंटाईन मुदत संपल्यामुळे तिला परवाच्या दिवशीच तिच्या घरी पाठविण्यात आले होते.

काल संपूर्ण दिवस तिला घरातील एका वेगळ्या खोलीतही होम क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते; मात्र आता शाळेतील दोघेजण कोरोनाबाधित निघाल्यामुळे त्या तरुणीसह आणखी एका कुटुंबीयांना सावंतवाडीत आणण्यात आले असून त्या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली पथक कारिवडे येथे दाखल झाले होते. त्यांच्यासोबत प्रताधिकार सुशांत खांडेकर आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे आदीही दाखल झाले आहेत. संबंधित कोरोनाग्रस्त, तरुणी व तिचे कुटुंबीय आणखी कोणाच्या संपर्कात आले आहेत का याचीही चौकशी सुरू आहे. जोखमीच्या व अती जोखमीच्या लोकांचीही तपासणीही करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांनी दिली. 

अफवा..रुग्ण...आणि संभ्रम 
दरम्यान, निरवडे गावामध्ये दोन रुग्ण सापडल्याची अफवा नागरिकांत पसरली होती. त्यानंतर निरवडे पंचक्रोशीतील गावातील नागरिक खडबडून जागे झाले होते. सरपंच प्रमोद गावडे यांनी आरोग्य प्रशासनाशी संपर्क साधून याबाबत खात्री केली असता निरवडे नसून कारिवडे रुग्ण सापडल्याची माहिती त्यांना देण्यात आली; मात्र त्यामुळे काही काळ संभ्रम निर्माण झाल्यामुळे याबाबत त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact sawantwadi konkan sindhudurg