कोरोनाचा आलेख रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

जिल्ह्यात मुंबईकरांचे दरदिवशी एक ते दीड हजारांच्या आसपास आगमन होत आहे. त्यातच या जिल्ह्यात 214 कोरोनाबाधितांची संख्या पोहचली आहे. आज आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊन मृत्यूची संख्या पाच झाली आहे.

ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या सामाजिक प्रसाराचा धोका ओळखत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी गुरुवारपासून (ता. 2 जुलै) जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाउन जाहीर केले आहे. 8 जुलैपर्यंत राहणाऱ्या या लॉकडाउनमध्ये पहिल्या, दुसऱ्या लॉकडाउनप्रमाणे कडक निर्बंध राहणार आहेत. या कालावधीत जीवनावश्‍यक सेवा, कृषी वगळता सर्व व्यवस्थापन बंद राहणार आहेत, असे आज जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

जिल्ह्यात मुंबईकरांचे दरदिवशी एक ते दीड हजारांच्या आसपास आगमन होत आहे. त्यातच या जिल्ह्यात 214 कोरोनाबाधितांची संख्या पोहचली आहे. आज आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊन मृत्यूची संख्या पाच झाली आहे. कोरोनाचा या जिल्ह्यातील वाढता आलेख रोखण्यासाठी 2 ते 8 जुलै या काळासाठी जिल्हा लॉकडाउन ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी दिली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे आदी उपस्थित होते. 

फळे, भाजी, दूध, मासे, मेडीसिन, किराणा आदी अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत. कारणाशिवाय अनावश्‍यक लोक बाहेर पडू नयेत. दुकाने आणि बाजारपेठांमध्ये सध्या होणारी गर्दी थांबावी, या हेतूने हे लॉकडाउन करण्यात येत आहे; मात्र कृषी विषयक कामे व सेवाही सुरू राहणार आहे. सरकारी-निमसरकारी कार्यालये दहा टक्के कर्मचारी घेऊन काम करणार आहेत; मात्र अत्यावश्‍यक सेवेतील सरकारी-निमसरकारी विभाग पूर्णपणे सुरू असतील. बाहेरून येणाऱ्या लोकांचे होम क्‍वारंटाईन कडक राहणार आहे. नागरिकांनी कोरोना साथीची जिल्ह्यात होणारी वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंजूलक्ष्मी यांनी केले आहे. 

पूर्वीप्रमाणेच होणार कडक कारवाई 
या कालावधीत जिल्ह्यातून परजिल्हा, राज्यात जाणाऱ्या नागरिकांना ई-पास घेऊन जाता येईल. अत्यावश्‍यक परिस्थितीतच नागरिकांनी बाहेर पडावे; मात्र कोणत्याही अत्यावश्‍यक कारणाशिवाय आढळल्यास नागरिकांवर पोलिस कारवाई करतील. पूर्वीप्रमाणे गुन्हे दाखल होतील व वाहन जप्तीची कारवाई होईल, असेही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्त आणि पोलिस कार्यवाही होणार आहे, असेही ते म्हणाले. 

सरकारी कार्यालयांत 10 टक्के उपस्थिती 
सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित हा लॉकडाउन आहे. 2 ते 8 जुलै या कालावधीत असलेले हे लॉकडाउन ज्याप्रमाणे नागरिकांसाठी कडक असणार आहे, त्याप्रमाणे जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय कार्यालयांना लागू करण्यात आले आहे. या कार्यालयांची उपस्थिती 10 टक्के केली आहे; मात्र आपत्कालीन यंत्रणेच्या विभागांची उपस्थिती 100 टक्के राहणार आहे. 

जिल्ह्यात अजून सामाजिक प्रसार नाही 
कणकवली तालुक्‍यात अलीकडे मिळालेले रुग्ण स्थानिक होते. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा सामाजिक प्रसार सुरू झाला का ? असा प्रश्न विचारला असता मंजूलक्ष्मी यांनी नाही म्हणून सांगितले. जिल्ह्यातील स्थानिक व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले असले तरी त्यांना झालेली बाधा ही मुंबई येथील बाधित व्यक्तिंमुळे झाली आहे. या सर्वांना कोणामुळे संसर्ग झाला हे समजले आहे. कोरोनाची लागण कोणामुळे झाली हे समजले नाही, तरच सामाजिक प्रसार सुरू झाला असे म्हणता येईल, असे सांगितले. 

मृत्यूचे प्रमाण राज्यात कमी 
यावेळी मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 1.8 टक्के आहे. राज्यात जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण सर्वांत कमी आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्याचे अन्य जिल्ह्यांचे प्रमाण जास्तीत जास्त तीन आहे; मात्र आपल्या जिल्ह्यात एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे नमुने घेण्याची संख्या 15 ते 35 राहिली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संपर्कातील हाय रिस्कपेक्षा लो रिस्क असलेल्या व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले आहेत. जिल्ह्यात लॅब सुरू झाल्याने एका दिवसात नमुने अहवाल मिळत आहेत. दिवसाला 96 नमुने आपण तपासत आहोत, असेही त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact sindhudurg district