चिंताजनक! लालपरीमागचे शुक्लकाष्ट संपेना, प्रतिसाद तर....

तुषार सावंत
रविवार, 12 जुलै 2020

कणकवलीहून देवगडकडे धावणाऱ्या एसटीचा एका वेळेचा उत्पन्नाचा आकडा केवळ तीनशे रुपये इतकाच होता. याचा अर्थ एसटी बस सेवा सुरू झाली, असली तरी प्रवासी मात्र घरातून बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. 

कणकवली (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावोगाव एसटी सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांकडून सध्या अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. शहरातून गावाकडे जाणाऱ्या किंवा तालुक्‍यातून तालुक्‍याकडे धावणाऱ्या गाड्यांमध्ये जेमतेम चार-पाच प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत. 

कोरोनामुळे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन करण्यात आले होते. त्यानंतर कालपासून (ता. 9) एसटी बससेवा नव्या वेळापत्रकानुसार सुरू झाली. दोन दिवस शहर आणि गावांमध्ये एसटी बस सेवा सुरू आहे; पण गावातून शहराकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमालीची रोडावली आहे. त्यातच गेले काही दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर गाठला आहे.

अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. साथरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटीने केवळ 22 प्रवाशांना ने - आण करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही प्रवाशांकडून या बससेवेचा फारसा लाभ घेतला जात नाही, असेच चित्र पाहायला मिळत आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचे नवे रुग्ण सातत्याने पुढे येत आहेत. त्यातच कणकवली सारख्या शहर आणि तालुक्‍यांमध्ये अधिक कंटेन्मेंट झोन आहेत. त्यामुळे गावातील प्रवाशांमध्ये भीती आहे. विशेषतः बाजारात खरेदीसाठी येणारा ग्रामीण भागातील ग्राहक कमालीचा रोडावला आहे. गावामध्ये थेटपणे भाजीपाला उपलब्ध होत आहे. केवळ औषधे किंवा दवाखान्यात येणारा रुग्ण हा एसटीच्या प्रवासी आहे. 

गेल्या काही वर्षात जिल्ह्यात वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे खाजगी वाहन चालकांमार्फत अनेक नागरिक शहरात येताना दिसत आहेत. जिल्ह्यात दुचाकी संख्या लाखाच्या घरात तर चारचाकी संख्या वाढलेली आहे. रिक्षा, सहाआसनी रिक्षाही मुबलक आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांमध्ये शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

सध्या शाळा महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थी घरातून बाहेर पडत नाहीत. तर ज्येष्ठ नागरिक भीतीपोटी शहरात येत नाहीत किंवा त्यांना एसटीमध्ये प्रवेशही दिला जात नाही. एसटी प्रवाशांच्या सवलती सध्या बंद आहेत. त्यामुळे पूर्ण तिकीट घेऊनच ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवास करावा लागत आहे. परिणामी एसटीमध्ये अगदी महत्त्वाच्या कामाला बाहेर पडणारेच प्रवासी पाहायला मिळतात.

कणकवलीहून देवगडकडे धावणाऱ्या एसटीचा एका वेळेचा उत्पन्नाचा आकडा केवळ तीनशे रुपये इतकाच होता. याचा अर्थ एसटी बस सेवा सुरू झाली, असली तरी प्रवासी मात्र घरातून बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात काही दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्यामुळे वाहतुकीचे मार्ग ठप्प आहेत. परिणामी एसटीकडे प्रवासी फारसे वळताना दिसत नाहीत. तरीही आवश्‍यक मार्गावर बस सेवा सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील वाहतूक ठप्प आहे. झाडे कोसळल्यामुळेही रस्ते बंद आहेत. त्याचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. 
- प्रकाश रसाळ, विभाग नियंत्रक, कणकवली 

जिल्ह्यात केवळ 73 फेऱ्या सुरू 
जिल्ह्यात पुर्वी नियमित वेळापत्रकाप्रमाणे दररोज 2100 फेऱ्या होत होत्या; मात्र सध्याच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नव्या वेळापत्रकाप्रमाणे 73 फेऱ्या सुरू आहेत. या फेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद फारच कमी आहे. जिल्हाबाहेरील किंवा आंतरराज्यफेऱ्या सध्या बंद आहेत. 

संपादन ः राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact ST bus service konkan sindhudurg