वेंगुर्लेवासीयांच्या चिंतेत वाढ, प्रशासनाचीही एकच धावपळ

दीपेश परब
Monday, 31 August 2020

शिरोडा येथे 5, मोचेमाड येथे 12, न्हैचीआड येथे 6, वेंगुर्ले शहर राऊळवाडा येथे 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे आधीच्या पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील आहेत.

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून वेंगुर्लेवासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. काल (ता.29) रात्री आणि आज सकाळीपर्यंत आलेल्या अहवालानुसार एकूण 33 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली आहे. 

यात शिरोडा येथे 5, मोचेमाड येथे 12, न्हैचीआड येथे 6, वेंगुर्ले शहर राऊळवाडा येथे 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे आधीच्या पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील आहेत. आज आरवली सोन्सुरे येथे 1 स्थानिक व्यक्ती व शिरोडा- केरवाडा येथे गोव्यातून आलेला व विलगिकरणात असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार लोकरे यांनी दिली.

मोचेमाड देऊळवाडी येथे आज सर्वाधिक 12 कोरोना रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण आहे. यावेळी याठिकाणी तहसीलदार प्रवीण लोकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्‍विनी माईणकर, सरपंच, पोलीस उपनिरीक्षक रुपाली गोरड, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, वैद्यकीय कर्मचारी यांनी पाहणी केली. 

परिसर कंटेन्मेंट झोन 
मोचेमाड देऊळवाडी याठिकाणचा 200 मिटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला. कोरोना विषाणूचा गाव-वाडीमध्ये वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्‍यकता असेल तरच बाहेर पडावे, मास्कचा वापर करावा, गर्दी टाळावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तालुक्‍यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांमुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact vengurla konkan sindhudurg