किती निष्काळजीपणा? रेल्वेतून उतरताच ठोकली जंगलात धूम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

राजधानी एक्‍स्प्रेस क्रॉसिंगसाठी मडूरे स्टेशननजीक थांबली असता 25 हून अधिक प्रवाशांनी जंगलात पळ काढला.

बांदा (सिंधुदुर्ग) -  दिल्लीकडून मडगावकडे जाणाऱ्या राजधानी एक्‍स्प्रेसमधून मडूरे रेल्वे स्थानकनजीक कर्नाटकचे 25 हून अधिक प्रवासी उतरुन जंगलात पळाले. पैकी 3 प्रवाशांना रोणापाल ग्रामस्थांनी पकडले आहे. क्‍वारंटाईन होण्याच्या भीतीने त्यांनी हे कृत्य केले. हा प्रकार आज दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडला. 

राजधानी एक्‍स्प्रेस क्रॉसिंगसाठी मडूरे स्टेशननजीक थांबली असता 25 हून अधिक प्रवाशांनी जंगलात पळ काढला. रेल्वे गार्डने याबाबत रेल्वे स्थानकावर माहिती देताच एकच खळबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता तिघेजण रोणापाल ग्रामस्थांच्या तावडीत सापडले आहेत. बांदा पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आपण भटकळ (कर्नाटक) येथील रहिवासी असून दिल्लीला गेलो होतो. मडगाव रेल्वे स्थानकावर क्वारंटाईन होण्याच्या भीतीने आपण मडूरेत उतरल्याचे तीनही प्रवाशांनी सांगितले. घटनास्थळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे, उपसरपंच भिकाजी केणी, माजी सरपंच उदय देऊलकर, प्रकाश गावडे, यशवंत कुबल, सुदीन गावडे, पोलिसपाटील निर्जरा परब उपस्थित होते. 

इतर पळून गेलेल्या प्रवाशांची माहिती मिळाली नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा 8 रुग्ण सापडल्याने या प्रवाशांचा तत्काळ शोध घ्यावा, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या तिघांना गोवा पोलिसांकडे देण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact workers konkan sindhudurg