esakal | कोरोना रोखण्यासाठी सिंधुदुर्गात "चारसूत्री' 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus issue meeting oros konkan sindhudurg

यापुढे अँटिजेन टेस्ट न करता आरटीपीसीआर चाचणीच्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व यंत्रणाना सतर्क होण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

कोरोना रोखण्यासाठी सिंधुदुर्गात "चारसूत्री' 

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोनाचे पुन्हा येणारे संकट रोखण्यासाठी जिल्ह्यात चारसूत्री कार्यक्रमांची आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घोषणा केली. कोरोना चाचण्या वाढविणे, कोरोना मृत्यू दर कमी करणे यांसह विनामास्क लोकांवर दंडात्मक कारवाई व कार्यक्रमांवर करडी नजर या चार गोष्टींचा यात समावेश आहे. यापुढे अँटिजेन टेस्ट न करता आरटीपीसीआर चाचणीच्या सूचना केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व यंत्रणाना सतर्क होण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

अन्य जिल्ह्यांत बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सिंधुदुर्गात रुग्ण वाढत नसले तरी भविष्यात रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सुचविण्यासाठी जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी सर्व यंत्रणेची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा प्रजनन व बाल अधिकारी डॉ. संदेश कांबळे उपस्थित होते. 

पत्रकार परिषदेत मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ""यापुढे सामाजिक, धार्मिक किंवा घरगुती कार्यक्रमामध्ये 50 संख्या आहे का, सोशल डिस्टन्स पाळले जाते का, मास्क घातला काय, याची शहानिशा करण्यासाठी महसूल, पोलिस व जिल्हा परिषद, पालिका क्षेत्रात मुख्याधिकारी यांना अचानक भेटी देण्याच्या सक्त सूचना आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास नोटीस देऊन कारवाई होईल. घराबाहेर मास्क न वापरणाऱ्यांवर सुद्धा कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यापुढे मास्क न लावता कोणीही घराबाहेर पडू नये.'' 

त्या म्हणाल्या, ""जिल्ह्यात नवीन रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी आहे. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात चाचण्याही होत नाहीत. त्यामुळे चाचण्या वाढविण्यास आरोग्य यंत्रणेला सांगण्यात आले. त्यांना उद्दिष्ट दिले आहे. दुसरीकडे जिल्ह्यात चाचणी टाळण्याची मानसिकता वाढली आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेणे, तो भाग कंटेन्मेंट झोन करणे तसेच हाय व लो रिस्क संपर्कातील व्यक्तींची आरटीपीसीआर टेस्टचेही आदेश दिले आहेत. खासगी डॉक्‍टरांनी रुग्ण कोरोना संशयित असल्यास तत्काळ शासकीय यंत्रणेला कळवावे.'' 

कोरोना काळात चांगले काम करणाऱ्या जिल्ह्यात सिंधुदुर्गचा समावेश आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर राज्यापेक्षा कमी आहे; परंतु हा दर यापेक्षा कमी करण्याचा प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने नियोजन आहे.'' 

परराज्यातून येणाऱ्यांवर विशेष लक्ष 
शासनाने आदेश दिल्यानुसार दिल्ली, गोवा, राजस्थान आणि केरळ राज्यातून येणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष असणार आहे. या चार राज्यांतून आलेल्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केलीच जाणार आहे. पालिका व ग्रामपंचायत स्तरावरून याबाबत माहिती संकलन सुरू आहे. गोवा, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्हा सीमेवर तपासणी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहितीही मंजुलक्ष्मी यांनी दिली. 

या आहेत सूचना 
* लक्षणे असल्यास लपवू नका 
* कोरोना चाचणी तातडीने करून घ्या 
* आपल्यापासून दुसरा बाधित होणार नाही, याची काळजी घ्या 
* खासगी डॉक्‍टर व यंत्रणेने आठवड्यातून एकदा कोरोना चाचणी करावी 
* आठवडा बाजार व्यापारी, रिक्षाचालक यांचीही टेस्ट करणार 

संपादन - राहुल पाटील