
लांजाः महिलेला तिचा पती घरातच फरशीने मारहाण करत होता. हा प्रकार थांबवण्यास कोणी पुढे आला नाही. दहावीतील एका मुलीने ओरडा अन् महिलेचा आक्रोश ऐकला. ती त्या घरात गेली. कोणी त्या महिलेला सोडवत नाही हेही पाहिले. प्रसंगावधान दाखवत त्या खोलीला बाहेरून कडी लावली. त्यानंतर पोलीस आले अन् अनर्थ टळला. प्रसंगावधान अन् धाडस दाखवणाऱ्या या मुलीचे नाव आहे विद्या येमुळ. तालुक्यातील भडे येथे हा प्रकार घडला.
लांजा तालुक्यातील भडे गावात एक जण पत्नीला रात्रीच्या वेळी फरशीने मारत होता. परंतु आसपासचे कोणीही त्या महिलेला वाचविण्यासाठी पुढे गेले नाही. त्या परिसरात राहणारी विद्या येमुळ ही मुलगी अभ्यास करत बसली होती. त्यावेळी तिला महिलेचा ओरडा ऐकू आला. ती बाहेर आली. त्यावेळी एक जण पत्नीला मारत आहे, असे तिच्या निदर्शनास आले. विद्याने प्रसंगावधान दाखवले. हा प्रकार ज्या घरात होत होता. त्या घराला बाहेरून कडी लावून घेतली. त्यांनतर तिने भडे पोलीस पाटील यांच्याशी संपर्क केला. यानंतर ११२ नंबर वर संपर्क करण्यात आला आणि मारहाणीच्या प्रकाराबद्दल सांगण्यात आले.
दरम्यान, ११२ वर संपर्क केल्यानंतर पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीसांचे एक पथक तत्काळ भडे येथे रवाना झाले. भडे येथे पोहोचताच पोलीसांनी संबंधिताला ताब्यात घेतले आणि अनर्थ टळला.