सिंधुदुर्गमधील लॅबचा प्रश्‍न लवकरच मार्गी - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

मुख्यमंत्री ठाकरे हे सकारात्मक असून त्यांनी मुख्य सचिव आशिष कुमार यांना यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

कुडाळ (सिंधुदुर्ग) कोविड 19 च्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शिवसेनेच्या सर्व आमदारांसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (ता. 27) रात्री 10 ते 1 वाजेपर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यामध्ये आमदारांनी मांडलेले प्रश्‍न जाणून घेत ते तत्काळ सोडवण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले. तसेच सिंधुदुर्गमधील लॅबचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

आमदार नाईक यांनी यावेळी मार्च अखेरीस बिडीएसद्वारे ज्या ज्या विभागाला पैसे दिले होते ते मागे घेतले आहेत. ते परत देण्याबाबत तसेच येथील महिला बाल रुग्णालयाचे उर्वरित काम पूर्ण करून त्याचा वापर कोविडसाठी करण्याबाबत मुद्दे उपस्थित केले. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे हे सकारात्मक असून त्यांनी मुख्य सचिव आशिष कुमार यांना यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी आमदार नाईक म्हणाले, ""सिंधुदुर्ग हा छोटा जिल्हा असून या ठिकाणी 250 बेड आयसोलेशनचे आहेत. सिंधुदुर्गात येणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांची संख्या पाहता कोविडच्या पार्श्‍वभूमीवर प्राथमिक तयारी म्हणून जिल्ह्यात आयसोलेशनचे बेड वाढवले पाहिजेत. कुडाळ येथे महिला बाल रुग्णालय असून त्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्या रुग्णालयाचे उर्वरित काम पूर्ण केले तर ते रुग्णालय कोविडसाठी वापरता येईल. त्यात आयसोलेशनची सुविधा निर्माण करता येईल. त्यामुळे या रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यावा.

शासनाच्या तिजोरीवरील भार कमी व्हावा म्हणून सरकारने 26 मार्चला बिडीएसद्वारे ज्या ज्या विभागाला पैसे दिले होते ते मागे घेतले आहेत. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम, मत्स्य, नियोजन, ग्रामविकास विभाग, या विभागातील पैसे मागे घेतले आहेत. त्यामुळे विकासकामांवर याचा परिणाम होत आहे. ते पैसे पुन्हा त्या त्या विभागाकडे वर्ग करावेत.'' 

मुख्य सचिवांना आदेश 
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या मुख्य सचिव कुमार यांना यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गमध्येही अद्ययावत कोविड लॅबसाठी परवानगी देण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. यामुळे सिंधुदुर्गमधील लॅबचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid test lab issue konkan sindhudurg