esakal | पगार न दिल्याने मालकाला घडवली अद्दल ; ७ लाखाचे पिस्टनच चोरले
sakal

बोलून बातमी शोधा

crime case in guhagar 7 lakh rupees pistol stolen from working place in ratnagiri

अनेकवेळा मागणी करूनही पगार न दिल्याच्या रागातून मालकाला अद्दल घडविण्यासाठी त्यांनी पिस्टन चोरले.

पगार न दिल्याने मालकाला घडवली अद्दल ; ७ लाखाचे पिस्टनच चोरले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गुहागर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील निगुंडळ येथील खडी क्रशरवर उभ्या असलेल्या पोकलेनचे सुमारे ७ लाखांचे १० पितळी पिस्टन चोरीला गेल्याची घटना १९ जानेवारीला रात्री घडली होती. या घटनेमध्ये रुपकिशोर महतो याला गुहागर पोलिसांनी इस्लामपूर (वाळवा, सांगली) येथून अटक केली आहे. बेपत्ता झालेल्या किशोर महतो याचाही शोध पोलिस घेत आहेत.

२० जानेवारीला आनंद जगदाळे (रा. पेडगाव, ता. खटाव, जि. सातारा) यांनी गुहागर पोलिस ठाण्यात पोकलेनचे ७ लाखांचे पितळी पिस्टन चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिस निरीक्षक अरविंद बोडके व सहा. पोलिस निरीक्षक बी. के. जाधव यांचे मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास करताना अंमलदार हनुमंत नलावडे यांनी किशोर महतोचे मोबाईल कॉल्सची तपासणी केली. त्यामध्ये किशोरचा भाऊ रुपकिशोर महतो हा १९ जानेवारीला गुन्हा घडल्याच्या रात्री निगुंडळ परिसरात आल्याचे लक्षात आले.

हेही वाचा - ग्रामस्थांनी तिच्या हातात गावाचा कारभार देण्याचा निर्णय घेतला -

पोलिसांना रुपकिशोर महतो सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्‍यातील इस्लामपूर येथे असल्याचे समजले. पोलिसांनी ५ फेब्रुवारीला इस्लामपूरला रुपकिशोर महतोला अटक केली. ६ फेब्रुवारीला त्याला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मागितली. रुपकिशोर महतोने त्याचा भाऊ किशोर महतो याच्यासोबत पिस्टन चोरल्याचे कबुल केले. हे पिस्टन फुरसुंगी पुणे येथे ठेवल्याचे सांगितले. पोलिस उपनिरीक्षक दीपक कदम आणि त्यांच्या टिमने फुरसुंगीत जावून ते पितळी पिस्टन (मुद्देमाल) ताब्यात घेतला आहे. यातील मुख्य आरोपी किशोर महतो अजून फरार आहे.

पगार दिला नाही म्हणून केली चोरी

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे या प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर महतोला पोकलेन मालक जगदाळे यांनी पगार दिला नसल्याचे आरोपीने सांगितले. अनेकवेळा मागणी करूनही पगार न दिल्याच्या रागातून मालकाला अद्दल घडविण्यासाठी त्यांनी पिस्टन चोरले.

 हेही वाचा - ७० वर्षांच्या शेवंती आजींची कमाल ; आता कारभार हाकण्यास तयार -

संपादन - स्नेहल कदम