esakal | मोबाईल शॉपीत चोरी, पावणेपाच लाखांच्या ऐवजावर डल्ला ; कामगारच निघाले चोर

बोलून बातमी शोधा

crime cases in ratnagiri employees arrested by police for crime}

शॉपीच्या भिंतीला ज्या प्रकारे कोरून भगदाड पाडण्यात आले होते. त्यावरून चोरटे बांधकाम क्षेत्रातील अनुभवी कामगार असल्याचा पोलिसांचा अंदाज होता.

मोबाईल शॉपीत चोरी, पावणेपाच लाखांच्या ऐवजावर डल्ला ; कामगारच निघाले चोर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : बांधकामाचे काम करणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या कामगारांनीच शहराबाहेरील कुवारबाव येथील नव्या मोबाईल शॉपीची रेकी करून ती फोडल्याचे उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसी खाक्‍या दाखविल्यावर काल रात्री उशिरा चोरी उघडकीस आली. चोरट्यांकडून चार लाख ८७ हजार रुपयांचे मोबाईल, ब्ल्यू टूथ, रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी दोन कामगारांना अटक केली असून, आणखी काही साथीदारांचा शोध सुरू आहे. हारुन मुबाकर हुसेन रशीद (वय २२), साहिल मोहसीन आलम शेख (२२, रा. पश्‍चिम बंगाल) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.

कुवारबाव एसटी थांब्यासमोर स्नेहल साळवी यांनी पंधरा दिवसांपूर्वी ‘मॅंगोज मोबाईल’ शॉपी सुरू केली होती. २६ फेब्रुवारीला सकाळी त्यांना मोबाईल शॉपी फोडल्याचे निदर्शनास आले. शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा समांतर तपास करीत होते. शॉपीच्या भिंतीला ज्या प्रकारे कोरून भगदाड पाडण्यात आले होते. त्यावरून चोरटे बांधकाम क्षेत्रातील अनुभवी कामगार असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. शहर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेने परिसरात बांधकामावरील कामगारांची माहिती घेऊन चौकशी सुरू केली. दरम्यान, संशयितांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

हेही वाचा - यंदा देवगड हापूस मर्यादितच

पोलिस टीमची कामगिरी

पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पोलिस कर्मचारी सुभाष भागणे, मिलिंद कदम, शांताराम झोरे, रमीज शेख, सागर साळवी, उत्तम सासवे, अमोल भोसले, नितीन डोमणे, बाळू पालकर यांनी ही कामगिरी केली. 

प्लॅन तडीस नेला, तो प्रयत्न फसला

मोबाईल शॉपी फोडण्याचा त्यांनी प्लॅन तयार केला आणि तडीस नेला. मात्र, मोबाईल विकण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. चोरलेले मोबाईल सिमेंटच्या पोत्यात भरून ठेवले होते. लपवून ठेवलेले सुमारे चार लाख ७४ हजार १४९ किमतीचे सुमारे ३८ मोबाईल, ब्ल्यू टूथ जप्त केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला.

पोलिस चौकीच्या बाजूलाच ते कामगार

पोलिस चौकीच्या बाजूला एका इमारतीचे प्लास्टर करण्यासाठी पश्‍चिम बंगालमधील कामगार असल्याची माहिती मिळाली. तेथील दहा ते पंधरा कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यापैकी हारून मुबाकर हुसेन रशीद, साहिल मोहसीन आलम या दोघांनीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. पोलिसांनी दोघांची स्वतंत्र चौकशी केली. त्यात विसंगती आढळल्याने पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला. पोलिसी इंगा दाखविल्यांतर दोघांनी आपण चोरी केल्याची कबुली दिली.

संपादन - स्नेहल कदम