esakal | Ratnagiri : गुन्हे शोध, शिक्षांची संख्या वाढीची गरज; मंत्री सतेज पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

satej patil

Ratnagiri : गुन्हे शोध, शिक्षांची संख्या वाढीची गरज; मंत्री सतेज पाटील

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : जिल्हा पोलिस दलाने चक्रीवादळ, कोरोना महामारी, महापूर या महामारी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये सामाजिक बांधिलकीतून पोलिस दालाने केलेले काम कौतुकास्पद आहे. पोलिस दल अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच नवीन पदे भरली जाणार आहेत. पोलिस अधिक्षक कार्यालय, पोलिस वसाहतीचा प्रकल्प आणला जाईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याशी चर्चा करून हा निर्णय होईल. गुन्हे उघडकीस येण्याचे आणि शिक्षेचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. पोलिस अधिक्षकांनी त्या अनुषंगाने आराखडा केला, अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, माझ्याकडे असलेल्या खात्यांचा मी आढावा घेतला. पोलिस दलाची बैठक घेतली. यामध्ये माझ्या पोलिसांनी महामारीमध्ये गावंच्या गाव दत्तक घेतली, कोविड सेंटर उभारली, ९७ टक्के लसीकरण केले. चक्रीवादळ आणि महापूरामध्ये सामाजिक बांधिलकीतून झोकुन देऊन काम केले. अनेकांचे प्राण वाचवले, अनेकांना मदतीचा हात दिली. त्यामुळे मी समाधानी आहे. नव्याने दलाला वाहने दिली आहेत. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने दहा पैकी ८ स्पीड बोटी कार्यरत आहेत. नव्याने पोलिस भरती केली जाणार आहे. त्यामुळे दल सक्षम करत आहोत.गुन्हे उघडकीस आणण्याचे आणि शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासाठी काही सूचना केल्या आहेत. कोरोना काळामध्ये ऑनलाईन खरेदीवर भर दिला जात आहे. त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीचे सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबतची जनजागृती आणि प्रबोधन सुरू आहे. दक्षता कमिट्यामध्ये ५० टक्के युवती आणि युवकांनी सहभागी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे.

जिल्ह्याला १ कोटीचा सीसी टीव्ही प्रकल्प राबविला जाणार आहे. गृहविभागाची तांत्रिक मान्यता बाकी आहे. पोलिस अधिक्षक कार्यालय आणि पोलिस वसाहत तांत्रिक गोष्टीमध्ये रखडलेत. मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत एखादा प्रकल्प येईल, असे पाटील यांनी सांगितले.

माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट

जिल्ह्यात ३ हजार ८०० माजी सैनिक आहेत. त्यांना मालमत्ता करामध्ये सुट देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाविकास आघाडी सरकारणे घेतला आहे. त्यापैकी १ हजार ५०० जणांनी लाभ घेतला आहे. खेड आणि चिपळूण तालुक्यामध्ये सर्वांत जास्त माजी सैनिक आहेत. उर्वरित माजी सैनिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असा आवाहन पाटील यांनी केले.

loading image
go to top