
पुढील कारवाईसाठी आम्ही महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या कोल्हापूर येथील वरिष्ठ कार्यालयाकडे या प्रकरणी अहवाल पाठविलेला आहे.
खेड ( रत्नागिरी ) - लोटे औद्योगिक वसाहतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या असगणी फाटा येथे घटनास्थळावर सोडण्यात आलेले रासायनिक सांडपाणी नाही तर हे डायलुटेड पेन्ट सल्फ्युरिक ऍसिड (बाय प्रॉडक्ट ऑफ द इंडस्ट्रीज) आहे. टॅंकरचालकांनी योजना इंडस्ट्रीज आणि वनविड केमिकल कंपनीमधून हे टॅंकर भरल्याची कबुली दिली आहे. टॅंकरचालक व मालक तसेच दोन्ही कंपन्यावर गुन्हा दाखल केला, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी अजय चव्हाण यांनी दिली.
पुढील कारवाईसाठी आम्ही महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या कोल्हापूर येथील वरिष्ठ कार्यालयाकडे या प्रकरणी अहवाल पाठविलेला आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांवर कारवाई होईल, यात शंका नाही. रसायन वाहून नेणारा टॅंकर हा मध्यप्रदेशच्या उज्जेन येथील साहिल केमिकल व टॅंकर या ट्रान्सपोर्ट कंपनीचा आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणाले, यापुढे देखील स्थानिक ग्रामस्थांनी संतर्क राहून आम्हाला सहकार्य करावे.
रस्त्यालगतच्या नाल्यात घातक रसायन सोडताना असगणी आणि घाणेखुंट येथील काही जागरूक नागरिकांनी दोन टॅंकरचालकांना नुकतेच पकडले. हे रासायनिक केमिकल लोटे औद्योगिक वसाहतीतील वनविड केमिकल आणि योजना इंडस्ट्रिज या दोन कंपन्याची नावे सांगितली. त्यामुळे सहाजिकच लोटे औद्योगिक वसाहतीतील वातावरण ढवळून निघाले.
बाय प्रॉडक्टशी जुळणारे नव्हते
12 नोव्हेंबरला असगणी येथील काही युवकांना असगणी फाट्यानजीकच्या नाल्यामध्ये घातक रसायन फेकल्याचे निदर्शनास आले होते. त्या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. त्या वेळी त्या रसायनाचे नमुने तपासले होते. ते लोटेतील कारखान्याच्या बाय प्रॉडक्टशी जुळणारे नव्हते.
रसायन सोडण्याशी आमचा संबंध नाहीच ः योजना इंडस्ट्रीज
महामार्गावरील असगणी नजीक रसायन सोडण्याचा प्रकार घडला त्याच्याशी आमच्या कंपनीचा संबंध नाही.घटनास्थळावर आमच्या येथून भरून गेलेला टॅंकर पूर्ण भरलेल्या अवस्थेत तसाच उभा होता. त्या टॅंकरमधून कोणतेही रासायन बाहेर सोडण्यात आलेले नव्हते. अद्यापही तो टॅंकर तसाच लोटे पोलिस ठाण्याच्या आवारात पूर्ण भरलेल्या स्थितीत उभा आहे. त्यामुळे आमच्या कंपनीमधील कोणतेही रसायन या ठिकाणी सोडण्यात आलेले नाही, असा खुलासा योजना इंडस्ट्रीजतर्फे करण्यात आला.
लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक प्रक्रियायुक्त रसायन महामार्गावरील असगणीनजीक उघड्यावर सोडण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी योजना इंडस्ट्रीज या कंपनीचे नाव पुढे आले.
या संदर्भात योजना इंडस्ट्रीजचे प्रशासकीय अधिकारी सुशांत सावंत यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, योजना इंडस्ट्रीज ही आमची कंपनी खाण्याच्या कलरमध्ये मिसळण्यात येणारे रॉ मटेरियल (इथाईल, बेन्झाईन, ऍनलाईन सल्फोलीक ऍसिड) बनविण्याचे काम करते. या प्रक्रियेतून जे वेस्ट मटेरियल बाहेर पडते. ते आम्ही पुन्हा वापरू शकत नाही. त्यासाठी आम्ही हे वेस्ट मटेरियल (स्पेंट सल्फ्युरिक ऍसिड) मध्यप्रदेश येथील बालाजी केमिकल कंपनीला गेले काही महिने पाठवत आहोत. हे मटेरियल पाठवण्यासाठी लागणारा ट्रान्सपोर्टचा खर्चदेखील आम्हालाच करावा लागत आहे. मध्यप्रदेश येथील साहिल केमिकल ऍड ट्रान्सपोर्ट कंपनीला कागदोपत्री आणि कायदेशीर प्रक्रिया करून आठवड्यातून दोनवेळा हे वेस्ट मटेरियल पाठवून देतो. (ता. 22) रात्री साडेआठ वाजता हे वेस्ट मटेरियल घेऊन टॅंकरचालक निघून गेला आणि (ता. 23) रोजी पहाटेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळावर आमच्या येथून भरून गेलेला टॅंकर पूर्ण भरलेल्या अवस्थेत तसाच उभा होता. आमच्या कंपनीमधील कोणतेही रसायन या ठिकाणी सोडण्यात आलेले नाही.
खटाटोप आम्ही का केला असता?
जर कंपनीपासून दोन किलोमीटर अंतरावर आम्हाला असे रसायन सोडायचे असेल तर मध्यप्रदेश येथील बालाजी केमिकल कंपनीला वेस्ट मटेरियल पाठवण्यासाठी ही कागदोपत्री आणि कायदेशीर प्रक्रिया करण्याचा खटाटोप आम्ही का केला असता, असा प्रश्न सावंत यांनी करीत कंपनीवरील आरोप खोडून काढला तसेच स्थानिक ग्रामस्थांनी कंपन्यांना सहकार्य करावे, अशी विनंती सावंत यांनी केली.