
दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : निष्क्रयता व अपयश लपविण्यासाठी त्यांनी भाजप नेते व खासदार नारायण राणे यांच्या विरोधात जुनेच राजकीय तुणतुणे वाजवण्यास सुरुवात केली आहे, असा पलटवार करत तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी माजी वित्त व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यावर हल्लाबोल केला.
केसरकर यांनी राणे यांच्यावर टीका केली होती. त्याला भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हा चिटणीस रमेश दळवी, माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य चंदू मळीक, नाना देसाई, संजय विर्नोडकर, सुरेंद्र सावंत, अंकुश वेटे, फोंडू हडीकर आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, की केसरकर यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेने तीनवेळा निवडून दिले; मात्र केसरकरांनी आपल्या कारकिर्दीत पत्रकार परिषदा घेऊन विविध घोषणा करण्यापलिकडे काहीच केले नाही. त्यांनी या मतदारसंघात केलेले एक तरी ठोस विकासकाम दाखवून द्यावे.
आडाळी एमआयडीसी येथे त्यांनी नेमके किती उद्योग-व्यवसाय आणले? किती रोजगार दिला? येथील ग्रामीण रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा मिळाल्याचे सांगून नारळ फोडला त्याचे काय झाले? बांदा-दोडामार्ग-आयी या रस्त्याच्या १२० कोटी रुपयांचे काम १५ दिवसांत सुरू होईल, अशी घोषणा निवडणुकीपुर्वी त्यांनी केली होती. ते काम मार्गी लागले का? बांदा-वाफोली येथे चष्म्याचा कारखाना सुरू व्हायचा होता तो झाला का? महापूर व भूस्खलनात नुकसान झालेल्या शेतकरी वर्गाला तत्कालीन वित्तमंत्री म्हणून किती कोटी रुपयांची मदत केली, ते केसरकरांनी जाहीर करावे.
राणेंवर टीका करण्याचा अधिकार नाही
केसरकर यांनी राजकीय कारकीर्द तपासून पाहावी. त्यांनी मदत केल्यामुळेच केसरकर सावंतवाडीचे नगराध्यक्ष झाले. राणेंच्या कृपाशीर्वादामुळेच ते आमदार झाले. दहशतवादाचा बागुलबुवा करून मातोश्रीला खूश करत मंत्री झाले. अशा कृतघ्न व्यक्तीला राणे यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. यावेळी श्री. नाडकर्णी, नगरसेवक संतोष नानचे, श्री. दळवी, श्री. मळीक यांनी रखडलेल्या विकास कामांवरुन श्री. केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.