esakal | आंबा, काजूसह रब्बीची 100 हेक्‍टरची हानी ; कोकणात अवकाळीचा फटका

बोलून बातमी शोधा

crop of cashew and mango hectory damage in ratnagiri}

पावसाने टॉमेटो, कलिंगडसह भाजीपाल्याचे सुमारे दहा हेक्‍टरवरील भाजीपाला लागवडीचे नुकसान झाले आहे. 

आंबा, काजूसह रब्बीची 100 हेक्‍टरची हानी ; कोकणात अवकाळीचा फटका
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी मुसळधार पावसासह गारांनी आंबा, काजूसह रब्बीचे सुमारे 100 हेक्‍टरवरील नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून सर्व्हे सुरू असून त्यात आणखीन भर पडण्याची शक्‍यता आहे. सर्वाधिक फटका संगमेश्‍वर, चिपळूण तालुक्‍याला बसला. जिल्ह्यात 18 फेब्रुवारीला अवकाळी मुसळधार पावसाने पहाटेच्या सुमारास रंग दाखवले. त्याच दिवशी सायंकाळी चिपळूण, संगमेश्‍वर, लांजा, रत्नागिरीसह राजापूर तालुक्‍यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

काही ठिकाणी गारांचा पाऊसही झाला. रत्नागिरी तालुक्‍यात बसणी, नेवरे, गणपतीपुळे, करबुडे, वेतोशी, नेवरेत तर लांजा तालुक्‍यात वेरळ, शिपोशी, कोचरी, सालपे, पालू, केळवली, माचाळ, हुंबरवणे, चिंचुर्टी या भागात गारा पडल्या. याचा फटका हापूसला बसला आहे. आंबा तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना गारा थेट फळावर पडल्यामुळे ते डागाळले आहेत. काही ठिकाणी कैरीची गळ झाली असून फळं कुजली आहेत. 

हेही वाचा - कोकण : जिल्हा आरोग्य अधिकारी धारेवर ; कारभार भोंगळ असल्याचा ठपका -

पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे तुडतुडा आणि बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे फवारणीचा एक हात अधिक मारावा लागत आहे. त्याचा खर्चही वाढलेला आहे. या पावसाने झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सुरू झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात 100 हेक्‍टरवर नुकसान झाले असून त्यात आणखी वाढ होऊ शकते. सर्वाधिक फटका हापूसला बसला आहे. काजू बी पावसामुळे गळून नुकसान झाले. पावसाने टॉमेटो, कलिंगडसह भाजीपाल्याचे सुमारे दहा हेक्‍टरवरील भाजीपाला लागवडीचे नुकसान झाले आहे. 

"पाऊस आणि गारांमुळे झालेल्या नुकसानाचा सर्व्हे केला जात आहे. त्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. आंबा, काजूसह रब्बीतील काही पिकांना पावसाचा फटका बसलेला आहे. एकत्रित अहवाल शासनाकडे पाठविला जाईल."

- शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी

एक दृष्टिक्षेप

  • 18 फेब्रुवारीला पडला अवकाळी पाउस 
  • आंबा तयार होण्याची प्रक्रिया सुरू असताना संकट 
  • गारा थेट फळावर पडल्यामुळे ते डागाळले 
  • काही ठिकाणी कैरीची गळ; फळं कुजलीही 
  • सर्वाधिक फटका बसला हापूसला 

संपादन - स्नेहल कदम