हळद लागवडीतून नवी उमेद ; मंत्र्यांकडून कोकणवासियांच्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक

सचिन माळी
Saturday, 31 October 2020

राज्य शासनाच्या वतीने सर्वोत्तोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन महसूल, ग्रामविकास, खारभूमी, बंदर विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

मंडणगड (रत्नागिरी) : बचत गटांच्या माध्यमातून मंडणगड तालुक्यात करण्यात आलेली हळद लागवडीचा उपक्रम चांगला असून महिलांच्या जीवनात नवी उमेद भरण्याचे काम प्रशंसनीय आहे. कोकणात अशा प्रकारचे अनेक प्रकल्प उभारणीसाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वोत्तोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन महसूल, ग्रामविकास, खारभूमी, बंदर विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. तुळशी येथील बचत गटाच्या हळद लागवडीची पाहणी करताना त्यांनी ग्रामविकासाच्या मुद्द्यांवर भाष्य करताना ग्रामीण भागातील उमेदच्या कामाचे कौतुक केले.

हेही वाचा - ‘इशारे पे इशारे’ ; राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेत चुरस -

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ऑक्टोबर रोजी पंचायत समिती आढावा बैठकीनंतर तुळशी, आंबडवे गावाला भेट दिली. तुळशी गावात रस्त्यालगत हळद उत्पादक गटाच्या वतीने हळद लागवड करण्यात आली आहे. याठिकाणी राज्यमंत्री सत्तार, आमदार योगेश कदम यांनी भेट दिली. यावेळी तालुका व्यवस्थापक रुपेश मर्चंडे व प्रभाग समन्वयीका समिधा सापटे यांनी या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.

तालुक्यात तुळशी, आंबडवे, वेळास, निगडी, पणदेरी, शेनाळे, म्हाप्रळ, पालवणी विविध ठिकाणी बचत गटांच्या माध्यमातून सुमारे दोन एकरवर करण्यात आलेली हळद लागवडीवर प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावर सत्तार यांनी अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण भागात राबविण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन दर्शविला. उमेद अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे मानधन रखडल्याची बाब उपस्थित महिलांनी निदर्शनात आणून दिली. यावर कोरोना लॉकडाऊनमुळे यात थोडी अनियमितता आल्याचे सांगत त्यात सुरळीतपणा आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सत्तार म्हणाले.

हेही वाचा -  शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष भाजपच्या वाटेवर -

बचत गटांच्या माध्यमातून उमेदचे ग्रामीण भागातील काम अत्यंत महत्वपूर्ण असून महिला सक्षमीकरणाची ही जमेची बाजू असल्याचे कौतुकोउद्गार त्यांनी काढले. यावेळी आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, सभापती स्नेहल सकपाळ, उपसभापती प्रणाली चिले, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, माजी जिप सदस्या अस्मिता केंद्रे, बचत गटाच्या प्रमुख दिपांजली धाडवे, कृषी विस्तार अधिकारी, बचत गटांच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crop of turmeric in konkan appreciation by a abdul sattar with the help of umed activity in ratnagiri