सुधागडमध्ये धरणक्षेत्र व धबधब्यांवर पर्यटकांचे जथ्ये

अमित गवळे 
Tuesday, 9 July 2019

पाली(रायगड) : जिल्ह्यातील काही धबधबे धोकादायक आहेत म्हणून तेथे पर्यटनासाठी शासनाने बंदी आणली आहे. मात्र सुधागड तालुक्यातील पांढरे शुभ्र धबधबे, धरणांचे भरून वाहणारे सांडवे पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्यामूळे पावसाळी पर्यटनासाठी हि पर्यटकांना जणु काही पर्वणीच आहे. मात्र हे धरणक्षेत्र व धबधबे मद्यपींना हक्काचे आंदण झाले आहेत. 

पाली(रायगड) : जिल्ह्यातील काही धबधबे धोकादायक आहेत म्हणून तेथे पर्यटनासाठी शासनाने बंदी आणली आहे. मात्र सुधागड तालुक्यातील पांढरे शुभ्र धबधबे, धरणांचे भरून वाहणारे सांडवे पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्यामूळे पावसाळी पर्यटनासाठी हि पर्यटकांना जणु काही पर्वणीच आहे. मात्र हे धरणक्षेत्र व धबधबे मद्यपींना हक्काचे आंदण झाले आहेत. 

धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यापेक्षा तालुक्यातील सुरक्षित धबधबे, ओढे व धरणे येथे पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक पसंती देत आहेत. इतर तालुक्यातील पर्यटक देखील येथे आवर्जुन येत असतात. येथील पिलोसरी येथील घपकी गाव, उद्धर, सिद्धेश्वर, भावशेत, आपटवणे, नाडसूर व पडसरे येथील धबधबे पर्यटकांनी गजबजलेले असतात. तसेच उन्हेरे, कवेळे व कोंडगाव येथील धरणांच्या ओसंडून वाहणाऱ्या पाण्यात मौजमजा घेण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करत आहेत. शनिवार, रविवारी व सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येत असतात. पण येथे मद्यपींचा धांगडधिंगा देखील असतो. परिणामी, येथे खबरदारी व सुरक्षितता घेण्याची आवश्यकता आहे. तसेच गर्दिच्या दिवशी पोलिस तैनात ठेवण्यात यावेत अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे.

तालुक्यातील विविध ठिकाणचे धबधबे खुपच आकर्षक आहेत. दुरवर कोठेही पावसाळी पर्यटनासाठी जाण्यापेक्षा येथे जावून चिंब भिजण्याचा आनंद घेता येतो. तसेच, निसर्गाशी एकरुप देखील होता येते. मात्र काही ठिकाणी मद्यपी खुलेआम मद्यपान करतांना दिसतात. अशा पर्यटकांनी अतीउत्साह टाळावा व येथे मद्यप्राशन व कचरा करु नये. पोलिसांनी देखील अशा ठिकाणी गस्त घालणे किंवा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
- अमित निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य, पाली

तालुक्यात पर्यटक येणे आवश्यक आहे. मात्र पावसाळ्यात जे धोकादायक धबधबे आणि धरणक्षेत्र आहेत तेथे प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. याबाबत सोमवारी (ता.8) पोलीस, उत्पादनशुल्क व महसूल विभाग आणि गटविकास अधिकारी यांची बैठक झाली. त्यानुसार उन्हेरे, कवेळे व कोंडगाव धरण तसेच पडसरे धबधबा येथे पोलीस गस्ती पथक नेमणार आहेत. तर उत्पादनशुल्क विभाग जवळच्या बियर शॉपी आणि वाईन्स शॉपवर लक्ष ठेवणार आहेत. सर्व ग्रामपंचायती मार्फत तेथे धोकादायक सूचना फलक लावल्या जाणार आहेत. सर्व प्रकारची खबरदारी आणि सुरक्षा घेतली आहे.
- दिलीप रायन्नावर, तहसीलदार, पाली-सुधागड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A crowd of tourists on the dam and waterfalls in Sudhagad