esakal | मासळी सुकविण्याच्या ड्रायरमध्ये चिरडून कामगार ठार;एक गंभीर, रत्नागिरीतील घटना

बोलून बातमी शोधा

मासळी सुकविण्याच्या ड्रायरमध्ये चिरडून कामगार ठार: एक गंभीर; रत्नागिरीतील घटना
मासळी सुकविण्याच्या ड्रायरमध्ये चिरडून कामगार ठार: एक गंभीर; रत्नागिरीतील घटना
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : एमआयडीसीमधील टी. जे. मरीन फिशमिलमध्ये मासळी सुकविणार्‍या ड्रायरमध्ये चिरडून एका कामगाराचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी आहे. ड्रायर साफ करीत असताना अचानक ड्रायर सुरू झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. ग्रामीण पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. संतोष विश्राम घवाळी (वय 37, रा. पानवल) असे अपघातात ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर सहकारी सुमित अनंत पांचाळ (वय 25, रा. कुवारबांव) हे गंभीर जखमी आहेत.

शहरानजवळच्या एमआयडीसी परिसरात टी.जे. मरीन ही फिशमिल आहे. त्या कंपनीत हे कामगार आहेत. कंपनीचे मासळी सुकविण्याचे चार ड्रायर आहेत. त्यापैकी तीन सुरू होते. एक ड्रायर साफसफाईसाठी बंद ठेवला होता. संतोष घवाळी आणि सुमित पांचाळ हे तो ड्रायर साफ करीत होते. या दरम्यान कंपनीतील अन्य दोन ड्रायर सुरू करण्यास दुसर्‍या कामगारांना सांगितले. तेव्हा साफसफाईसाठी काढण्यात आलेल्या ड्रायरचे बटन दाबल्याने हे दोन्ही कामगार त्यामध्ये सापडले. यात संतोष घवाळी यांचा अर्धाभाग ड्रायरमध्ये चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुमित पांचाळ यांना गभीर दुखापती झाल्या आहेत.

या अपघाताची माहिती तत्काळ ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्यासह सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मयत संतोष घवाळी याचा मृतदेह कापडात बांधून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. तर जखमीला उपचारासाठी हलविले. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान 2 कामगार काम करीत असताना अचानक ड्रायर कसा सुरू झाला? तो कोणी जाणूनबुजून केला की चुकून झाला, याची चौकशी पोलिस करीत आहेत. या कंपनीमध्ये मासळीची सुकटी बनविली जाते.

Edited By- Archana Banage