esakal | जनता कर्फ्यूमुळे कणकवलीच्या आर्थिक चक्राला 'ब्रेक'
sakal

बोलून बातमी शोधा

जनता कर्फ्यूमुळे कणकवलीच्या आर्थिक चक्राला 'ब्रेक'

जनता कर्फ्यूमुळे कणकवलीच्या आर्थिक चक्राला 'ब्रेक'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली : तालुक्‍यात आणि शहरात 1 ते 10 मे या कालावधीत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन तहसीलदार, नगरपंचायत, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व व्यापारी संघटनेतर्फे करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिक, व्यापारी तसेच विविध आस्थापनांनी गेले दोन दिवस उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे जिल्ह्याची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेला कणकवली तालुक्‍याच्या आर्थिक चक्राला कोरोनामुळे ब्रेक लागला.

कोरोना बाधितांची संख्या दिवसाला सरासरी पन्नासाच्या आसपास आहे. त्याच मृत्यूचे प्रमाणही इतर तालुक्‍यापेक्षा अधिक असल्याने चिंता मात्र कायम आहे. जिल्हात केवळ कणकवली तालुक्‍यात जनता कर्फ्यु लागु करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी कणकवली तालुक्‍यात 1 मेपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. पहिलाच दिवस हा शासकिय सुटीचा आणि एक मेचे सगळे कार्यक्रम रद्द असल्याने फारशी वर्दळ दिसली नाही. त्यामुळे कणकवली शहरासह तालुक्‍यातील खारेपाठण, फोंडाघाट, कनेडी, नांदगाव या बाजारपेठा कडकडीत बंद राहिल्या.

हेही वाचा: व्यावसायिकासह वडीलांवर चाकु हल्ला; जामसंडेतील घटना

कणकवली शहर हे रात्र दिवस गजबजलेले; पण गेले दोन दिवस रस्त्यावर निरव शांतता पाहायला मिळाली. रेल्वेने येणारे चाकरमानी वगळता फारसे प्रवाशी नाहीत. खासगी बस गाड्या बंद आहेत. मार्गावरील वर्दळही तशी थांबलेली आहे. जिल्हाच्या प्रवेशद्वारावर कडक पोलिस पहारा आणि मेडिकल चेकअप असल्याने परजिल्हातून वाहने येताना दिसत नाहीत. केवळ अत्यावश्‍य सेवेतील वाहने धावत आहेत.

रुग्णवाढीची भीती

कणकवली शहरात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. याचा परिणाम जवळच्या गावातील नागरिकांवर झाला आहे. आता गेल्या दोन चार दिवसापासून तालुक्‍यात काही गावत रूग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. या पाश्‍वभूमीवर कणकवली तालुक्‍यात जनता कर्फ्यू पाळण्यात आला; मात्र 30 एप्रिलला झालेली गर्दी लक्षात घेता रूग्ण वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

शहरातील स्थिती

  • औषध दुकाने सुरू

  • रेल्वेप्रवाशी वाहतूक सुरू

  • अत्यावश्‍य सेवा सुरू

  • सर्व दवाखाने सुरू

loading image