घाबरु नका ; पन्हळे धरणाच्या सांडव्याला गळती मात्र धरणाला धोका नाही

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

तहसीलदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून धरणाला धोका नसल्याचे त्यांनी सांगितले.

लांजा (रत्नागिरी) : तालुक्‍यातील पन्हळे धरणाच्या सांडव्याला गळती लागली असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान, यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तहसीलदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून धरणाला धोका नसल्याचे त्यांनी सांगितले.

मंगळवारी (२०) तहसीलदार पोपट ओमासे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, उपअभियंता एस. व्ही. नलावडे, कनिष्ठ अभियंता मंगेश शिंदे, पंचायत समिती सदस्य अनिल कसबले यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली आणि धोका नसल्याचे सांगितले.

हेही वाचा -  गोळवणचा बेपत्ता मुलगा सहा वर्षांनी सापडला -

तालुक्‍यातील पन्हळे या ठिकाणी १९८० मध्ये हे मातीचे धरण बांधण्यात आले. सोमवारी सायंकाळी पन्हळे धरणाजवळ असलेल्या ग्रामस्थांना धरणातील सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाल्याचे निदर्शनास आले. सांडव्यातून चिखलयुक्त गढूळ पाणी वाहत असल्याने घाबरलेल्या ग्रामस्थांनी पंचायत समिती सदस्य अनिल कसबले यांना याची कल्पना दिली. कसबले यांनी याबाबत तत्काळ पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. व्ही. नलावडे यांना माहिती दिली.

सोमवारी (१९) रात्री उपअभियंता एस. व्ही. नलावडे, कनिष्ठ अभियंता मंगेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सांडव्यातून गढूळ पाणी येत असल्याची पाहणी केली. धरणातून रात्रीपासून पाण्याचा विसर्गास काही प्रमाणात सुरवात झाली, अशी माहिती एस. व्ही. नलावडे यांनी पत्रकारांना दिली. 

हेही वाचा - कोकण मार्गावर शुक्रवारपासून धावणार फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाड्या -

तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे

धरणाच्या गळतीमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणाच्या गळतीविषयी अनेक तक्रारी करून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप अनिल कसबले यांनी केला. कसबले यांच्यासह माजी उपसरपंच तुकाराम मसणे, ग्रामपंचायत सदस्य विकास कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष हरिश्‍चंद्र गुरव, प्रदीप मसणे व ग्रामस्थ उपस्थित होते.
 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the dam of lanja ratnagiri pehle leak but the officer said its not dangerous in ratnagiri