संकटांची मालिकाच! धरण कोरडे; शेती, बागायती करपल्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

उन्हाळ्यात हे धरण पूर्णपणे कोरडे पडत असल्याने या धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या वाफोली नळपाणी योजनेवर याचा परिणाम होतो. 

बांदा (सिंधुदुर्ग) - वाफोली गावची जीवनदायिनी असणारे लघुपाटबंधारे विभागाचे धरण हे पूर्णपणे कोरडे पडल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. मॉन्सूनचे आगमन लांबल्यास येत्या काही दिवसांत पाण्याअभावी स्थानिकांना भीषण पाणीटंचाईशी सामना करावा लागणार आहे. 

वाफोली पंचक्रोशीत हरितक्रांती व्हावी यासाठी इंडो-जर्मन प्रकल्पांतर्गत या धरणाची 40 वर्षांपूर्वी निर्मिती करण्यात आली. सुरुवातीच्या काळात धरणात मुबलक पाणीसाठा होत असल्याने हा परिसर सुजलाम सुफलाम होता; मात्र कालांतराने धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे लघुपाटबंधारे खात्याने दुर्लक्ष केल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊ लागली. याचा विपरीत परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झाला. उन्हाळ्यात हे धरण पूर्णपणे कोरडे पडत असल्याने या धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या वाफोली नळपाणी योजनेवर याचा परिणाम होतो. 

2015 मध्ये धरणाच्या मुख्य गेटचा दरवाजा तुटल्याने या धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाहून गेला होता. यावर्षी मेच्या सुरुवातीलाच या धरणातील पाणी पातळीत कमालीची घट झाली होती. धरणातील पाणीसाठा पूर्णपणे आटला आहे. 

शेती, बागायती करपल्या 
या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने वाफोली गावातील शेती, बागायती पूर्णपणे करपून गेल्या आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात या धरणातील पाणीसाठा कमी होतो. दरवर्षी धरण कोरडे पडत असल्याने उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई रोखण्यासाठी या धरणाच्या दुरुस्तीकडे लघुपाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dam water problem vafoli konkan sindhudurg