esakal | ओटवणे कापाईवाडीत गव्यांचा धुडगूस 
sakal

बोलून बातमी शोधा

damage agriculture otavane kapaiwadi konkan sindhudurg

गव्यांच्या कळपाने काल (ता.6) रात्री ओटवणे कपाईवाडी येथील संगीता उपरकर यांच्या शेती बागायतीत धुडगूस घातला. यामध्ये चवळी, मका, मिरची, वाली व इतर उन्हाळी पिकांची नासधूस केली आहे. यात संगीता उपरकर यांचे सुमारे 60 हजारांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

ओटवणे कापाईवाडीत गव्यांचा धुडगूस 

sakal_logo
By
निलेश मोरजकर

बांदा (सिंधुदुर्ग) - ओटवणे-कापईवाडी परिसर पुन्हा एकदा गव्यांच्या दहशतीमुळे भयभीत झाला असून दररोज गवे शेती बागायती तसेच वस्तीत घुसून दहशत माजवत आहेत. रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत घराबाहेर पडणे ही जीवावर बेतणार आहे. नुकसानी बरोबर जीवही धोक्‍यात आला असून वनविभाग मात्र पंचनामा करण्यापलीकडे ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. 

गव्यांच्या कळपाने काल (ता.6) रात्री ओटवणे कपाईवाडी येथील संगीता उपरकर यांच्या शेती बागायतीत धुडगूस घातला. यामध्ये चवळी, मका, मिरची, वाली व इतर उन्हाळी पिकांची नासधूस केली आहे. यात संगीता उपरकर यांचे सुमारे 60 हजारांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, रूपाली पानगळे, बापू कोठावळे, रमेश वरेकर, रवींद्र कुडाळकर, गंगाराम कोठावळे, अंकुश नाईक यांच्या शेतीचीही यापूर्वी गव्यांच्या कळपाने मोठी हानी केली आहे. 

शेतकऱ्यांच्या मते, गव्यांचे कळप हे रात्रंदिवस भरवस्तीत वावरत असून वनविभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग असमर्थ ठरले आहे. पंचनामा करण्यापलीकडे वनविभाग ठोस उपाययोजना करत नाही, असे सांगत शेती बागायती स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी करावी, की गव्यांचे पोट भरण्यासाठी करावी? असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. कर्ज काढून शेती, बागायती केली अन गव्यांच्या उपद्रवामुळे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून काही जिवाचे बरे-वाईट केल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल शेतकऱ्यांमधून होत आहे. 

वेळीच सावध व्हा! 
2008 मध्ये याच वाडीमधील हत्तीच्या हल्ल्यात केशव उपरकर यांना जीव गमवावा लागला होता. आता गव्याच्या हल्ल्यात कोणाचा जीव जाणार याच्या प्रतीक्षेत वनविभाग आहे का? असा संतप्त प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत. लोकप्रतिनिधींनी गव्यांच्या मुक्त संचाराबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कानमंत्र देण्याची गरज असून शेतकरी मतदार राजाला दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

संपादन - राहुल पाटील

loading image