भिजलेलं भात फेकायला हात नाही उचलत

Damage to paddy father due to rains in ratnagiri
Damage to paddy father due to rains in ratnagiri

रत्नागिरी - कापलेली भातशेती नदीच्या पुराच्या पाण्यात भिजलीय. तीन ते चार महिने मेहनत करून पिकवलेले भात वाया गेले आहे. काहींना कोंब फुटलेत. भात वाळवले तरी त्याचा काहीच उपयोग नाही. ते उचलायचे आणि फेकून द्यायचे, अशी हतबलता मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी व्यक्‍त करत आहेत.

शुक्रवारी (ता. 16) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासात सरासरी 16.70 मिमी पाऊस झाला. त्यात रत्नागिरीत सर्वाधिक 65.40 मिमीची नोंद झाली. मंडणगड 3.90, दापोली 5.40, खेड 9.30, गुहागर 0.90, चिपळूण 8.10, संगमेश्‍वर 41.80, लांजा 10.20, राजापूर 5.30 मिमी पाऊस झाला. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा गुरुवारी (ता.15) सायंकाळी अरबी समुद्रात विलीन झाला. त्यानंतर जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला; मात्र रत्नागिरी तालुक्‍यात रात्रभर पाऊस पडतच होता. शुक्रवारी सकाळी पावसाने उघडीप दिली. पण दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यात राजापूरमधील अर्जुना, कोदवली, लांजा येथील मुचकुंदी, रत्नागिरीतील काजळी, बावनदी तर संगमेश्वरच्या शास्त्री नदी किनाऱ्यावरील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

 पुराच्या पाण्यात अनेकांची कापलेली शेती वाहून गेली तर उभे राहिलेले भात आडवे होऊन पाण्यातच होते. रत्नागिरी तालुक्‍यातील चांदेराई, हरचेरी, पोमेंडी, काजरघाटी, सोमेश्वर, निवळी, कोंडवी, बावनदी, टिके येथील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. निवळीत बावनदीचे पाणी किनारा ओलांडून आल्यामुळे भाताची उडवी वाहून जाण्याची भीती होती. उघडीप मिळाल्यामुळे ढगाळ वातावरणातही शेतकरी भिजलेले भात वाळवण्यासाठी धडपडत होते. काजरघाटीतील शेतकऱ्यांनी तांदूळ नाहीत तर नाही किमान कणी मिळेल या हेतून ओले भात झोडले. ते भात सुकवले तरीही त्याला कुबट वास येतो. तो तांदूळही विकणे दूरच, खाण्यायोग्यही राहत नाही. चार महिन्याच्या मेहनतीवर पाणी फेरल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. कोरोनामुळे आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्याचा घासही निसर्गाने हिरावून घेतला आहे. भाताबरोबर नाचणीचेही पीक वाहून गेले आहे.

पावसात राहिल्यामुळे भाताला कोंब फुटलेत. पेंढा खराब झाला असून गुरांना याचा काहिच फायदा होणार नाही. चांगलं वाटतयं तेवढच भात झोंडतोय, पण त्यामधून अख्खा तांदूळ मिळणार नाहीच.

- बाळकृष्ण शिंदे, शेतकरी


खूप शेतकरी अश्रू गाळत आहेत. या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळवून द्यावी.

- सुयोग उर्फ दादा दळी चांदेराई, माजी सरपंच.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com