वाडातर येथील नृत्यांगनेची नाट्यकलेसह मूर्तीकलेचीही जोपासना 

अजय सावंत
Thursday, 20 August 2020

गणेश चतुर्थी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना गणेश भक्तांना आकर्षक अशा सुबक मूर्ती देण्यासाठी गणेशमुर्तीकार सज्ज झालेले दिसत आहेत. कोरोना महामारी संकटात सुद्धा नियमाच्या अधीन राहून दीड ते अडीच ते साडेतीन फूटपर्यंत मूर्ती घडविण्याचे काम गणेशभक्तांच्या सूचनेनुसार करीत आहेत. 

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - वडिलांनी सुरू केलेली गणेशमूर्ती कार्यशाळा अविरत सुरू राहावी, गणेश भक्तांना आकर्षक व सुबक गणेशमूर्ती देता याव्यात, या उद्देशाने वाडातर (ता. देवगड) येथील नृत्य क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या नृत्यांगना सुप्रिया ढोके व त्यांचे बंधुराज सुमित ढोके या बंधू-भगिनींनी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून ही कला जोपासली आहे. श्री. ढोके घराण्याने नाट्यकला क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला, अशी या घराण्याची ओळख आहे. 

गणेश चतुर्थी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना गणेश भक्तांना आकर्षक अशा सुबक मूर्ती देण्यासाठी गणेशमुर्तीकार सज्ज झालेले दिसत आहेत. कोरोना महामारी संकटात सुद्धा नियमाच्या अधीन राहून दीड ते अडीच ते साडेतीन फूटपर्यंत मूर्ती घडविण्याचे काम गणेशभक्तांच्या सूचनेनुसार करीत आहेत. 

जिल्ह्यात असे अनेक गणेशमूर्तिकार आहेत की ते आपली गणेश कार्यशाळा अखंड सुरू राहावी, या उद्देशाने कार्यरत आहेत. विशेष म्हणजे गणेशमूर्ती घडविण्यात आता महिलासुद्धा मागे नाहीत. त्या पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात उतरल्या आहेत. हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे. वाडातर येथील नृत्यांगना सुप्रिया यांनी वडील सूर्यकांत व बंधू सुमित यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशमूर्ती साकारत आहेत. एक नामांकित महिला मूर्तिकार म्हणून आता त्यांचे नाव पुढे येत आहे. 

सुप्रिया ढोके म्हणाल्या, ""आमच्या वडिलांची नाट्य लेखक व दिग्दर्शक म्हणून ओळख आहे. त्यांची मुंबईत अनेक नाटके होत होती. नाट्यक्षेत्र सांभाळत असताना त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी श्री अदिश नावाने गणेश कार्यशाळा सुरू केली. एक नावाजलेले कलाकार म्हणून ते ओळखले जात आहेत. गणेश कार्यशाळेत मला वडिलांबरोबरच बंधू सुमितचे सातत्याने मार्गदर्शन मिळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता गेल्या पाच वर्षांपासून मी पूर्ण गणेशमूर्ति बनवायला लागले. आज गणेशभक्तांची मातीच्या मूर्तीपेक्षा हलक्‍या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपो) गणेशमूर्तीची मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली आहे. पूर्वी आमच्या शाळेत मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती बनवल्या जात होत्या. यावर्षी 25 ते 30 मुर्त्या आम्ही घडविल्या आहेत. कोरोना नियमाच्या अधीन राहून या गणेश कार्यशाळेत दीड ते साडेतीन फुटाच्या मूर्ती घडवल्या. या सर्व मूर्ती देवगड तालुक्‍यातील गावांमध्ये तसेच विजयदुर्ग या ठिकाणी जातात. वडिलांनी सुरू केलेली गणेश कार्यशाळा त्यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड सुरू राहावी, हा आमचा दृष्टिकोन आहे.'' 

""बंधू सुमित नाट्यक्षेत्राशी निगडित असून काही वर्षांपूर्वी त्यांनी डान्सर म्हणून नाव मिळवले आणि आता या गणेशमूर्ती घडविण्यामध्ये सुमितचे फार मोठे योगदान आहे. वाढती महागाई लक्षात घेता गणेशमुर्त्यांचे दरसुद्धा आम्ही गणेशभक्तांना परवडतील असे ठेवले आहेत. पैशापेक्षा सेवाभावी वृत्तीने श्रींच्या गणेशमूर्ती करताना मिळणारा आनंद हा मनाला समाधान देणारा आहे. 
- सुप्रिया ढोके, मूर्ती कलाकार 

 
संपादन - राजेंद्र घोरपडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dancer Supriya Dhoke Preserve Drama And Idol Making Art