दापोली मतदारसंघ भाजपला हवा - केदार साठे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जुलै 2019

दाभोळ - दापोली मतदारसंघातून भाजपलाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी  केली असल्याची माहिती भाजप जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

दाभोळ - दापोली मतदारसंघातून भाजपलाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी  केली असल्याची माहिती भाजप जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

युतीकडून हा मतदारसंघ भाजपलाच मिळावा, अशी ठाम मागणी दापोली, खेड, मंडणगड मधील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ६ जूनपासून पक्ष सभासद नोंदणी कार्यक्रम सुरू होत असून ३० हजार सभासद दापोली विधानसभा मतदारसंघात नोंदविण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दापोली नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसबरोबर केलेल्या प्रासंगिक कराराबाबत साठे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्‍त केली. ही आघाडी केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच सेनेकडून करण्यात आल्याचा आरोप साठे यांनी केला.

या आघाडीत सामील व्हा, ‘आमचं ठरलंय’, असा प्रस्ताव शिवसेनेकडून आम्हाला आला होता. मात्र आम्हीच तो नाकारला. राज्यात सेना-भाजप युती, असे धोरण असताना काँग्रेसबरोबर जाणे, हे आम्हाला योग्य वाटले नाही. म्हणून हा प्रस्ताव नाकारल्याचे साठे यांनी सांगितले. सेनेने काँग्रेस बरोबर केलेल्या युतीचा निषेध म्हणूनच आमच्या दोन नगरसेवकांनी नगराध्यक्ष निवडणुकीत अनुपस्थित राहून निषेध नोंदविल्याचे साठे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत सेनेकडून गेल्यावेळी कोणीही काम केले नसताना १७ हजार मतांचे आधिक्‍य गीते यांना मिळाले होते. या निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचारासाठी फिरताना दिसत होते. मात्र, मतदान वाढूनही गीते यांचे मताधिक्‍य वाढायचे सोडून कमी झाले आहे. यावेळी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष भाऊ इदाते, सभासद नोंदणी प्रमुख लहू साळुंखे, नगरसेविका रमा तांबे, तालुका सरचिटणीस संजय सावंत, अजय साळवी, योगेश कोवळे उपस्थित होते.

योगेश कदम यांची उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी
दरम्यान, पर्यावरणमंत्री रामदास कदम हे यांचे पुत्र योगेश कदम यांना उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. गेली पाच वर्षे या मतदारसंघात योगेश कदम काम करत आहेत. मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला १६ हजाराचे मताधिक्‍य या मतदारसंघातून मिळाले आहे. त्यावरून शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. या राजकीय पार्श्‍वभूमीवर भाजपची ही मागणी हास्यास्पद वाटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dapoli constituency should be BJP Kedar Sathe comment