दापोली पोलिसांची माणुसकी ; पतीच्या शोधात आलेल्या महिलेला मदत 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

पुण्यातून पतीशोधार्थ आलेल्या या महिलेची समजूत काढून तिला सुखरूप पुण्यात पाठवले

दाभोळ : चार वर्षीच्या मुलीला घेऊन दापोली बसस्थानकात मध्यरात्री बसलेल्या महिलेला दापोली पोलिसानी माणुसकी दाखवत साह्य केलेच, परंतु त्या पलिकडे जाऊन तिचे समुपदेशनही केले. पुण्यातून पतीशोधार्थ आलेल्या या महिलेची समजूत काढून तिला सुखरूप पुण्यात पाठवले. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास दापोली पोलिसांचे पथक गस्त घालत असता त्यांना एक महिला तिच्या 4 वर्षाच्या मुलीसह बसस्थानकात बसलेली आढळून आली. या दोघींना त्यांनी दापोली पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार हेडकॉन्स्टेबल साक्षी गुजर व त्यांच्या सहकारी दर्शना जुवळे यांनी या महिलेकडे चौकशी केली असता, तिचा नवरा दुसऱ्या बाईला घेऊन दापोलीत आला असल्याचे समजल्याने ही महिला त्याच्या शोधासाठी रागाच्याभरात पुणे येथून कॅबने दापोलीत आली होती. पण तिला नवऱ्याचा काही पत्ता लागला नाही. त्यानंतर साक्षी गुजर, दर्शना जुवळे, अजित गुजर यांनी तिची समजूत काढली व तिच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. 

हे पण वाचा तयारी पूर्ण झाल्यानंतरच टप्याटप्याने शाळा सुरू होणार

 

ज्या गाडीतून आली, त्याच गाडीतून माघारी 
सुरवातीला ही महिला काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. अखेर तिची समजूत काढण्यात पोलिसाना यश आले. तिच्या भावाशी तिचं बोलणे करून दिले. त्यानंतर ही महिला ज्या गाडीने आली होती तीच गाडी अर्ध्या वाटेतून परत मागवून महिला व तिच्या मुलीची पुन्हा पुणे येथे पाठवणी केली. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dapoli police help wome