ओटवणेत यंदा दसरोत्सव दर्शन ऑनलाईन 

महेश चव्हाण
Tuesday, 20 October 2020

खंडेनवमी आणि विजयादशमी असा दोन दिवस दसरोत्सव साजरा करण्याचा निर्णय स्थानिक देवस्थान कमिटी आणि देवस्थान मानकरी व सेवेकरी यांच्या बैठकीत घेण्यात आला.

ओटवणे (सिंधुदुर्ग) - श्री देवी सातेरी रवळनाथ पंचायतन देवस्थानाच्या वार्षिक दसरोत्सवाची परंपरा खंडीत होवू नये, यासाठी कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करुन खंडेनवमी आणि विजयादशमी असा दोन दिवस दसरोत्सव साजरा करण्याचा निर्णय स्थानिक देवस्थान कमिटी आणि देवस्थान मानकरी व सेवेकरी यांच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रसिद्ध दसरोत्सवाच्या काही क्षणांचे भाविकांना ऑनलाईन पद्धतीने दर्शन घडविण्यात येणार आहे. 
येथे काल (ता.18) सायंकाळी घेतलेल्या या बैठकीवेळी देवस्थान कमिटी, मानकरी, दैविक सेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. 24 व 25 रोजी हा सोहळा पार पडणार आहे.

सध्या कोरोना रोगाचे गावा गावात सामुहिक संक्रमण सुरू झाल्याने या उत्सवावर टांगती तलवार होती; परंतु कोरोनाचे सावट असले तरी हा उत्सव साध्या व छोट्या पद्धतीचा ठेवून गर्दी न करता परंपरेनुसार सोहळा पार पाडला जाणार आहे. येथील संस्थानकालीन दसरोत्सव म्हणजे भाविकांसाठी सोन्या, चांदीच्या अलंकारासह भरजरी वस्त्रांचा साज नजरेत भरण्याची पर्वणीच. खंडेनवमी व दशमी या दोन दिवशी कोट्यवधीचा ऐवज आणून श्री देव रवळनाथाचा हा सोहळा राजेशाही थाटात होत असतो. दैवीक तरंगे या दिवशी सोन्या, चांदीनी मढवली जातात. या सोहळ्याला जिल्ह्याभरातून तसेच गोवा राज्यातून हजारो भाविकांची गर्दी होते. 

मोठा पोलिस बंदोबस्तही 
सावंतवाडी संस्थानच्या सावंत-भोसले राजघराण्याचे कुलदैवत असलेले श्री देव रवळनाथाला या संस्थानची न्यायदेवता म्हणून ऐतिहासिक महत्व आहे. वर्षातून एकदाच होणाऱ्या देवस्थानच्या दसरोत्सवात रवळनाथाच्या आणि तरंगाच्या सुवर्ण अलंकारांचे दर्शन भाविकांना पाहता येते. त्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्तही असतो. 

भाविकांना आवाहन 
यावर्षी कोरोनामुळे या दसरोत्सवातील राजसत्ता व सुवर्ण वैभवाचा साज भाविकांना पाहता येणार नाही; मात्र या दसरोत्सवातील काही क्षणांचे भाविकांना ऑनलाईन दर्शन घडणार आहे. त्यामुळे यावर्षी हा दिमाखदार सोहळा साध्या पद्धतीने व नियमांचे पालन करून होईल. त्यामुळे भाविकांनी घरूनच सोहळा पाहवा, अशी विनंती येथील देवस्थान कमिटी अध्यक्ष रविंद्रनाथ गावकर, मानकरी आणि सेवेकरी यांनी केली आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Darshan of Dasarotsava at Otwane online