गाड्या पासिंगच्या अटी शिथिल करण्याची दशावतार लोककला चालक-मालक संघाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

दशावतारी लोककला चालक - मालक बहुउद्धेशिय संघ सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांची बुधवारी (ता. 14) भेट घेतली.

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) : कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील दशावतारी मंडळाच्या गाड्या पासिंग करताना असलेल्या अटी शिथिल कराव्यात, काही करांमध्ये सुध्दा सवलत मिळावी, अशी मागणी दशावतारी लोककला चालक - मालक बहुउद्धेशिय संघ सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देऊन केली. 

दशावतारी लोककला चालक - मालक बहुउद्धेशिय संघ सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांची बुधवारी (ता. 14) भेट घेतली. यावेळी दशावतारी लोककला चालक - मालक बहुउद्वेशीय संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष तुषार नाईक, उपाध्यक्ष नाथा नालंग - परब, सचिव सचिन पालव, सहसचिव सुधिर कलिंगण, खजिनदार देवेंद्र नाईक, सुधा दळवी, सुवर्णाकुमार मोचेमाडकर, बाबा मेस्त्री, सोनू दळवी, वैभव तोटकेकर उपस्थित होते. 

निवेदनात म्हटले आहे की, सध्या सुरू असलेल्या कोविड - 19 च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजलेला आहे. त्याचा परिणाम सर्व व्यवसायांवर झालेला आहे. या प्रादुर्भावामुळे आज कोकणातील लोककला दशावतार ह्या आमच्या कला व्यवसायात सुध्दा झळ पोचलेली आहे. जिल्ह्यात आज सुमारे 70-80 मंडळे कार्यरत आहेत. साधारणत: ऑक्‍टोबर ते मे असा दशावतार कलेचा हंगाम असून मार्चपासून आजमितीपर्यंत हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. आणि अजून केव्हा सुरू होईल हे देखिल अशास्वत आहे; परंतु प्रतिवर्षाप्रमाणे या मंडळाच्या गाड्या पासिंग करण्याची मुदत जवळ जवळ सर्वच मंडळाची आलेली आहे; पण कोरोना काळात या गाड्या पासिंग करणे, सर्व चालक मालकांना कठीण आहे. आमच्या मंडळाच्या गाड्या पासिंग करताना असलेल्या अटी शिथिल कराव्यात, काही करांमध्ये (व्यवसाय कर) सुध्दा सवलत मिळावी, अशी मागणी केली. 

अटी शिथिल करण्याचे प्रयत्न 
कोरोना महासंकटात दशावतार कलाकारांवर उद्धभवलेल्या एकूणच परिस्थितीबाबत दशावतार मंडळाच्या गाड्या पासिंग करताना असलेल्या अटी शिथिल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सावंत यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dashavtar Lokkala Driver Owners Association Demand of Relax Conditions Of Passing Vehicles