तपासासाठी मृतदेहावरील कपडे, दागिन्यांचे फोटो व्हायरल, धागेदोरे सापडणे शक्य

भूषण आरोसकर
Tuesday, 15 September 2020

आंबोली घाटामध्ये सापडलेल्या मृतदेहाने अनेक प्रश्न उपस्थित केले असून महिलेची ओळख पटविण्याचे काम पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी हाती घेतले आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - आंबोली घाटात आढळलेला अज्ञात मृतदेह कोणत्या महिलेचा आहे, याचा तपास सुरू असून आज तपासी अंमलदार तसेच पोलिस उपनिरीक्षक अमित गोते यांनी संबंधित महिलेच्या अंगावर सापडलेले कपडे व दागिन्यांचे फोटो गोवा, कर्नाटक व राज्यातील इतर पोलिस ठाण्यांना पाठवले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. आज राखून ठेवलेला मृतदेहाचा व्हिसेरा रासायनिक तपासणीसाठी रत्नागिरी येथील लॅबमध्ये पाठविण्यात आला तर "डीएनए' पुणे येथे पाठविण्यात आला. त्यामुळे एकंदरीत या प्रकरणाला पुढील तपासाला गती येणार आहे. 

आंबोली घाटामध्ये सापडलेल्या मृतदेहाने अनेक प्रश्न उपस्थित केले असून महिलेची ओळख पटविण्याचे काम पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी हाती घेतले आहे. काल आंबोली येथे जात सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. या प्रकरणाला आठवडा पूर्ण होऊन अद्यापपर्यंत कोणतेही नातेवाईक दाखल झाले नाहीत. या महिलेची कर्नाटक, गोवा राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना माहिती कळवली आहे.

पुराव्यासाठी महिलेच्या अंगावरील पैजण, कानातील रिंग, कपडे आदी गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. त्या महिलेचे विच्छेदन बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी केले. त्यामध्ये डोक्‍याचा भाग कुजलेला असल्यामुळे तिला मारहाण झाली की नाही याबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही; मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार अंगावर कोठेही मारहाणीच्या खुणा नाहीत, त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत गुढ कायम आहे. 

अंत्यसंस्कार होणार 
मृतदेह सापडून आठवडा पूर्ण होत असल्याने मृतदेहाची विल्हेवाट लावणे आवश्‍यक असल्याने उद्या (ता.15) सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा मृतदेह पालिकेच्या ताब्यात देऊन अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक अमित गोते यांनी दिली. 
दरम्यान, अधिक माहितीसाठी व्हिसेरा रत्नागिरीला पाठविला आहे. तिच्या केसाचे व हाडाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविल्याचे गोते यांनी सांगितले. 

वर्णन असे 
पोलिसानी वर्णन केल्याप्रमाणे ही महिला 30 ते 40 या वयोगटातील आहे. उंची चार फूट नऊ इंच आहे. समोरील दोन दात पडले असून बांधा मध्यम आहे. अंगावर मोरपंखी रंगाचा टॉप, हिरव्यापिवळ्या रंगाची नक्षी असलेली सफेद ओढणी, पायामध्ये चंदेरी रंगाचे नकली पैंजण, कानामध्ये काळसर धातूची रिंग आधी माहिती ओळख पटविण्यासाठी प्रसारीत करण्यात आली आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dead body issue amboli konkan sindhudurg