
नांदगाव (सिंधुदुर्ग) : मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव, असलदे, तावडेवाडी पियाळी नदी येथे वाहत्या पाण्यात अज्ञाताने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भली मोठी पोती भरून मृत ब्रॉयलर कोंबड्या टाकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, या कोंबड्या मृत झाल्यानंतर टाकल्या की जिवंत पोत्यात भरून टाकल्या, याबाबत माहिती समजू शकली नाही. मृत कोंबड्यांची पोती असलदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून विल्हेवाट लावण्यात आली.
या नदीशेजारीच नांदगाव व असलदे ग्रामपंचायतीच्या नळ-पाणी योजनेच्या विहिरी असल्याने पाणी दूषित होऊ नये यासाठी दोन्ही ग्रामपंचायतींनी सी. एल. पावडर टाकून पाणी शुद्धीकरण केले. घटनेची माहिती मिळताच असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच आफोजा नावलेकर, नांदगाव ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर, असलदे ग्रामसेवक आर. डी. सावंत, ग्रा. पं. सदस्य मस्जिद बटवाले, अरुण बापार्डेकर, भाई मोरजकर, नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर, श्रीकांत नार्वेकर, असलदे ग्रा. पं. कर्मचारी प्रकाश वाळके, सत्यवान घाडी, मधुसूदन परब, सरपंच पंढरी वायंगणकर आदींनी पोलिसांना खबर दिली.
नांदगाव, असलदेतील प्रकार
यावेळी कणकवली येथून पोलिस राजकुमार खाडे व कासार्डे पोलिस दूरक्षेत्राचे रमेश नारनवर यांनी घटनास्थळाची माहिती घेतली. रविवारीच या कोंबड्या टाकल्याची शक्यता आहे. असलदे ग्रामपंचायत सदस्य दिनेश तावडे यांचे शेजारीच घर असल्याने त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तत्काळ असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांना माहिती दिली. घटनास्थळाशेजारीच नळ-पाणी योजनेच्या विहिरी असल्याने परिसरात खळबळ उडाली.
हेही वाचा- Sakal Impact : इचलकरंजीत डॉक्टर अखेर नरमले....
कठोर कारवाईची मागणी
"कोरोना'च्या पार्श्वभूमीवर सध्या ब्रॉयलर कोंबड्या विक्रीत कमालीची घट झाली आहे. कोंबड्या होलसेल विक्री करणाऱ्या अज्ञातांचेच हे कृत्य असल्याचे असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी सांगितले. या कोंबड्या मृत झाल्यानंतर टाकल्या की जिवंत टाकल्या, याची माहिती मिळालेली नाही. अज्ञाताचा पोलिसांनी कसून शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.