हृदयाचे ठोके वाढले ; ‘खोदा पहाड और निकला चुहा’

राजेश शेळके
Sunday, 1 November 2020

मिर्‍या स्मशाभूमीजवळ गर्दीत खोदकाम सुरू झाले. खड्डा पडेल तसे जमलेल्यांची उत्सुकता ताणली.

रत्नागिरी : रक्ताळलेले महिलेचे कपडे, बाजूला काहीतरी पुरल्याच्या खूणा यामुळे गावातील लोकांच्या मनात संशयकल्लोळ निर्माण झाला. काहीतरी भयानक घटना घडली असावी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी ते पुरले असावे, याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी पोलिस, ग्रामसेवक, काही प्रतिष्ठीत बोलावले. मिर्‍या स्मशाभूमीजवळ गर्दीत खोदकाम सुरू झाले. खड्डा पडेल तसे जमलेल्यांची उत्सुकता ताणली. अचानक पांढरे कापड लागले. कोणाचातरी मृतदेह असेल असे वाटत होते पण निघाला मृत कुत्रा. 

हेही वाचा - आता प्रवासी बॅगांचा पॅटर्न बदलला ; चार हजार प्रकार ग्राहकांसाठी -

मिर्‍या येथील स्मशाभूमीजवळ काहीतरी पुरल्याचा संशय होता. बाजूला रक्ताळलेले कपडे पडले होते. पुरलेल्या ठिकाणी वस्तू ठेवल्या होत्या. खून करून मृतदेह पुरल्याचा अनेकांचा संशय होता. तशी तक्रार शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली. आज सायंकाळी पोलिस, ग्रामसेवक, स्थानिक ग्रामस्थ गोळा झाले. मिर्‍या गावात बातमी पसरली आणि गर्दी झाली. खोदकामाचे सर्व रेकॉर्डिंग करायचे ठरले. कामगार, खोरे, पिकाव आदी मागवले आणि खोदकाम सुरू झाले. 

हेही वाचा - रात्रीस खेळ फक्त शर्यतींचा चाले ; कोणत्याही परिस्थितीत शर्यत होणारच -

दीड फुटाच्या खाली एक पांढरा कपडा लागला. त्यामुळे काहीतरी पुरले असल्याचे निश्‍चित झाले. उपस्थितांच्या हृदयाचे ठोके वाढले. बाजूची माती काढण्यात आली. फावड्याने माती ओढत असताना मोठे केस वर आले. ते पाहिल्या पाहिल्या पोलिसांनी कुत्रा असल्याचा अंदाज वर्तवला. त्यानंतर कापडासहित त्याला वर काढण्यात आले. त्यावेळी माणसाऐवजी शेफर्ड जातीच्या पाळीव कुत्र्याचा मृतदेह पुरण्यात आला असल्याचे उघड झाले. पण रक्ताळलेले कपडे घटनास्थळी आढळल्याने संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागली आणि सर्वांची फसगत झाली.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the death of dog near mirya port in ratnagiri also police coming here