सर्पदंशाने युवकाचा मृत्यू; मृतदेह रस्त्यावर ठेवल्याने तणाव

सर्पदंशाने युवकाचा मृत्यू;  मृतदेह रस्त्यावर ठेवल्याने तणाव

दाभोळ - सर्पदंश झालेल्या किशोरवयीन मुलाला दापोली उपजिल्हा रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाले नाहीत. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी आज केला. टेटवली येथे नेलेला त्याचा मृतदेह दापोली - हर्णे मार्गावर रस्त्यावर आणून ठेवला. डॉक्‍टरविरोधी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मार्गावरून हटणार नाही, असा पवित्रा घेत उपजिल्हा रुग्णालयासमोर मार्ग काही काळ रोखला. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता.

दापोलीच्या पोलिस निरीक्षकांनी घेतलेल्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे तणाव निवळला. मृताच्या नातेवाइकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी सायंकाळपर्यत ठिय्या मांडला होता. टेटवली येथील मळेकर वाडीमधील पंकज कदम (वय १५) याला मंगळवारी (ता. २०) रात्री साडेअकराच्या सुमारास सर्पदंश झाला होता. पंकजने तो विषारी साप स्वतः मारून घरातील कुटुंबीयांना उठवले. त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकारी पहाटे उपलब्ध झाले नाहीत.

चार तासांनंतर प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला पाहण्यासाठी एक वैद्यकीय अधिकारी आले. पंकजला अत्यवस्थ झाल्याचे पाहून त्यांनी उपचारासाठी दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचा सल्ला दिला. नातेवाइकांनी त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथेही पंकजला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. पंकजला डेरवण रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू ओढवला.

मृतदेह टेटवली गावी आणण्यात आला. पंकजच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी काही ग्रामस्थ दापोली पोलिस ठाण्यात येऊन मागणी करू लागले. पोलिसांनी उपस्थितांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने नातेवाईक संतप्त झाले.

टेटवलीतील ग्रामस्थांनी पंकजचा मृतदेह दापोली उपजिल्हा रुग्णालयासमोरील दापोली - हर्णै रस्त्यावर भर उन्हात ठेवला. वैद्यकीय अधिकाऱ्यावर पोलिस गुन्हा दाखल करीत नाहीत तोपर्यंत मृतदेह हलविला जाणार नाही, असा पवित्रा घेतल्याने काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला. 

पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी शवविच्छेदन तीन डॉक्‍टरांच्या उपस्थितीत इन कॅमेरा करण्याचे आश्‍वासन देऊन संबंधित वैद्यकीय अधिकारी दोषी असल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला. दरम्यान, मुलाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद करण्याचे काम सुरू असून व्हिसेरा तपासणीचा अहवाल आल्यावर संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com