
जिल्ह्यातील युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेबाबत काही इच्छुकांची नावे जिल्हा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे आली आहेत
कॉंग्रेसमध्ये 'येथे' पुन्हा एकदा नियुक्ती वाद
रत्नागिरी - कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा नियुक्ती वाद उफाळून आला आहे. शहराध्यक्ष नियुक्ती वाद तात्पुरता थांबल्यानंतर आता रत्नागिरी तालुका युवक कॉंग्रेसपदाची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कालच एका गटाने भाग्येश मयेकर यांची रत्नागिरी तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची घोषणा केली होती; मात्र आपण अशी कोणतीही नियुक्ती केलेली नाही, असा खुलासा जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी आज केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील दोन्ही गट पुन्हा आमने-सामने ठाकले आहेत.
रत्नागिरी तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी मयेकर यांची निवड झाल्याचे कॉंग्रेसच्या एका गटाने काल कळविले होते. या वेळी रत्नागिरी जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, सरचिटणीस सुरेश कातकर, तालुकाध्यक्ष प्रसाद उपळेकर, चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, माजी गटाध्यक्ष रतन पवार, अशोक साळवी आदींनी याची घोषणा केल्याचे म्हटले होते. मात्र मयेकर यांची ही नियुक्ती औट घटकेची ठरली की काय असा संशय निर्माण होणारा खुलासा दस्तुरखुद्द युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांनी केला आहे.
हेही वाचा - लांजा नगरपंचायतीसाठी उद्या मतदान
जिल्ह्यातील युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेबाबत काही इच्छुकांची नावे जिल्हा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे आली आहेत; परंतु आजतागायत जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यामध्ये नव्याने नेमणुका केलेल्या नाहीत वा तशा प्रकारची शिफारसपत्र देण्यात आलेली नाहीत. काही वृत्तपत्रात नेमणुकांबाबतचे वृत्त छापून आलेले आहे ते वृत्त चुकीचे आहे. त्यांच्याशी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सहमत नाहीत, असा खुलासा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केला आहे.
हेही वाचा - चंद्रकांतदादा म्हणाले, येथे आम्ही कापले शिवसेनेचे नाक...
गटातटाचे राजकारण
कॉंग्रेसमधील कीर आणि भोसले गटाचा वाद संपता संपेना. यापूर्वी रत्नागिरी शहराध्यक्ष राकेश चव्हाण यांची नियुक्ती रद्द केल्याचा विषय, कॉंग्रेस भुवनला लावलेले टाळे आदी विषय मागे पडत असताना आता युवक तालुकाध्यक्ष नियुक्तीपदावरून नवीन वाद उफाळून आला आहे. त्यामुळे कॉंग्रेस गटातटाच्या राजकारणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.