चोर आले, रे चोर आले, शेरेबाजीवर भाजपनेते म्हणाले, तुम्ही महाचोर

Debate In Shiv sena BJP Malvan Muncipal Corporation
Debate In Shiv sena BJP Malvan Muncipal Corporation

मालवण (सिंधुदुर्ग ) : भाजपच्या नगरसेवकांनी स्टिंग ऑपरेशन करून पालिकेतील आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश केल्याचा आरोप केल्यानंतर आज झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार गदारोळ झाला. भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात काळ्या फिती लावून प्रवेश करत नगराध्यक्षांचा जाहीर निषेध केला.

भ्रष्टाचार केलेल्या नगराध्यक्षांना पिठासीन अधिकारी म्हणून बसण्याचा अधिकार नाही, असे सांगत तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभेतील सहाही विषयांवरील ठराव मंजूर करत सभागृहाचे कामकाज संपल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

पालिकेतील वातावरण तंग.... 

 दरम्यान, या गदारोळात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक यतीन खोत यांच्यात हमरातुमरी झाल्याने पालिकेतील वातावरण तंग बनले होते. ठेकेदाराच्या बिलाचा धनादेश देण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचे भाजपच्या नगरसेवकांनी स्टिंग ऑपरेशन केले. नगराध्यक्ष, पालिकेतील अधिकारी, कर्मचारी हे संगनमताने भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणीही भाजपने केली होती. याचे पडसाद आजच्या पालिका सर्वसाधारण सभेत उमटले.

घोषणाबाजी करत नगराध्यक्षांचा जाहीर निषेध....

सभेचे कामकाज सकाळी साडे अकरा वाजता सुरू झाले. सभेचे कामकाज सुरू होऊन काही वेळ जाताच माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गटनेते गणेश कुशे, दीपक पाटकर, जगदीश गावकर, ममता वराडकर, पूजा करलकर, पूजा सरकारे, आप्पा लुडबे यांनी सभागृहात प्रवेश करत निषेध असो, निषेध असो नगराध्यक्षांचा निषेध असो, नगराध्यक्ष हाय, हाय अशी घोषणाबाजी करत नगराध्यक्षांचा जाहीर निषेध सुरू केला.

नगराध्यक्षांना पिठासन अधिकारी म्हणून बसता येणार नाही....

ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, अशा नगराध्यक्षांना पिठासन अधिकारी म्हणून बसता येणार नाही. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. यात शिवसेना नगरसेवकांनी सभेचे कामकाज सुरू ठेवा, असे सांगितले. यात शिवसेना व भाजप नगरसेवक आमने-सामने आले. त्यांनी चोर आले, रे चोर आले, अशी शेरेबाजी केली. यावर भाजपसह अपक्ष नगरसेवक सुदेश आचरेकर यांनीही तुम्ही, महाचोर असे म्हटले. या दरम्यान सभेपुढील सर्व विषयांचे ठराव मंजूर करत सभागृहाचे कामकाज संपल्याचे सांगत नगराध्यक्ष सभागृहातून बाहेर पडले. 

आचरेकर व खोत यांच्यात हमरीतुमरी ...

दरम्यान, सभा संपल्यावर सभागृहातच असलेल्या माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक यतीन खोत यांच्यात हमरीतुमरी झाली. अन्य नगरसेवकांनी मध्यस्थी करत त्या दोघांनाही बाजूला केले. या प्रकारामुळे पालिकेतील वातावरण काहीकाळ तंग बनले होते. 

 ज्यांना चोर म्हणून हिणविले, तेच महाचोर....

स्टिंग ऑपरेशनमुळे नगराध्यक्षांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्यांनी विश्‍वासार्हता गमावली आहे. त्यामुळे अशा व्यक्तीने पिठासन अधिकारी म्हणून सभागृहात बसणे योग्य नाही. ही सभा त्यांनी बेकायदेशीररीत्या संपविली असून याबाबतची तक्रार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहोत. मुख्याधिकारी त्यांना साथ देत आहेत, हे योग्य नाही. सभा संपल्यानंतर ज्यांनी चोर म्हणून हिणविले, तेच महाचोर आहेत. वाळू चोरीमुळेच त्यांना दंड झाला. स्टिंग ऑपरेशननंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून ते काय निर्णय देतात याकडे लक्ष आहे. त्यानंतर आम्ही पुढील आंदोलनाची हत्यारे उपसू. जोपर्यत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यत काळ्या फिती लावून आम्ही कामकाज पाहू.'' 
- सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष 

 गटनेता म्हणून मालवणवासियांची जाहीर माफी मागतो....

24 वर्षाचा प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव म्हणून महेश कांदळगावकर यांना शहरवासियांनी निवडून दिले. मीही त्यांच्यासोबत मतांसाठी घरोघरी फिरलो; मात्र त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे प्रथम मी गटनेता म्हणून मालवणवासियांची जाहीर माफी मागतो. स्टिंग ऑपरेशनचे सबळ पुरावे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहेत. त्यामुळे त्याची चौकशी होत नाही, तोपर्यत नगराध्यक्षांना पिठासीन अधिकारी म्हणून बसता येणार नाही. त्यांनी आजची सभा सर्वांना वेठीस धरून चालविली तसेच त्यांच्या आरोप असल्यानेच आम्ही त्यांचा निषेध केला.'' 
- गणेश कुशे, गटनेता, भाजप 

महिला सदस्यांच्या उपस्थितीत  नगरसेवकांनी केली शिवीगाळ 
 
सभेचे कामकाज सुरू असताना सभागृहात येताना व बाहेर जाताना पिठासन अधिकाऱ्यांची परवानगी घ्यायची असते; मात्र हे सर्व धुडकावून देत विरोधी नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश केला. गेल्या महिनाभरातील राज्यातील राजकीय घडामोंडीनंतर काही नगरसेवक वैफल्यग्रस्त बनले आहेत. त्यामुळे प्रसिद्धीच्या हव्यासापोटी, वैफल्यापोटी जे त्यांनी सभागृहात प्रदर्शन मांडले, ते निषेधार्ह आहे. त्यांच्याकडे ठोस मुद्दे, पुरावे नसल्यानेच त्यांनी केवळ शो-बाजी केली. सभागृहात गोंधळ घालण्याऐवजी त्यांनी सभागृहात निषेधाचा ठराव मांडायला हवा होता; मात्र ते सभागृहात नाचत होते. महिला सदस्यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी शिवीगाळही केली. त्यामुळे त्यांच्या या कृतीचा आम्ही निषेध करत आहोत.'
- महेश कांदळगावकर, नगराध्यक्ष  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com