सिंधुदुर्गात मेडीकल कॉलेजसाठी ग्रामसभांचे ठराव घेण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

स्वातंत्र्यदिनी  होणाऱ्या ग्रामसभांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रत्येक गावाने ठराव घ्यावा व मुख्यमंत्र्यांना पाठवावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे समन्वयक अॅड. शामराव सावंत यांनी केले.

सावंतवाडी - सिंधुदुर्गातील आरोग्य सुविधांचा तुटवडा दूर करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, या मागणीसाठीचा लोकशाही मार्गाने लढा तीव्र करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. यासाठी येत्या स्वातंत्र्यदिनी  होणाऱ्या ग्रामसभांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रत्येक गावाने ठराव घ्यावा व मुख्यमंत्र्यांना पाठवावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे समन्वयक अॅड. शामराव सावंत यांनी केले.

येथील शासकीय विश्रामगृहावर आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ""जिल्ह्यात सरकारी आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. याचा फटका सर्वसामान्य सिंधुदुर्गवासियांना बसत आहे. पुरेशा आरोग्य सुविधांअभावी आतापर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची आश्‍वासने गेल्या काही वर्षात अनेकांनी दिली; मात्र ती पाळली गेली नाहीत. एकूण स्थिती पाहता नजिकच्या काळात येथील आरोग्य यंत्रणा सक्षम होण्याची शक्‍यचा धुसर आहे. 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हा यावरचा रामबाण उपाय आहे. हे महाविद्यालय झाल्यास जिल्ह्याला सक्षम रूग्णालय, महत्वाच्या सर्व आरोग्य सुविधा, तज्ञ डॉक्‍टर उपलब्ध होणार आहेत.''

अॅड. सावंत पुढे म्हणाले, ""लोकांची गरज लक्षात घेता येथील आरोग्य सुविधांचा प्रश्‍न लवकर सुटणे गरजेचे आहे. यामुळे हा लढा लोकशाही आयुधांचा वापर करून अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भार म्हणून येत्या 15 ऑगस्टला सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग व कुडाळ तालुक्‍यातील माणगांव खोऱ्यातील सर्व ग्रामपंचायतींनी शासकीय मेडीकल कॉलेजची मागणी करणारा ग्रामसभेचा ठराव घ्यावा. तो मुख्यमंत्र्यांना पाठवावा. त्याची एक प्रत कृती समितीकडे द्यावी. जेणेकरून आगामी लढ्यात याचा उपयोग होईल. या लढ्यात सर्वसामान्य जनतेने सहभागी व्हावे. हा लढा सिंधुदुर्गवासियांच्या आरोग्य सुविधेचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आहे. यासाठी जनमताचा रेटा तयार केल्याशिवाय पर्याय नाही.''

सावंतवाडी पालिकेने एकमताने हा ठराव मंजूर केला आहे. कृतीसमिती आवाहन करते की, वेंगुर्ले नगरपरिषद, दोडामार्ग नगरपंचायत तसेच सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग या पंचायत समितीने देखील अशाच धरतीवर ठराव घेवून जनमानसाच्या मागणीस व लढ्यास बळ द्यावे, असे आवाहन कृती समितीद्वारे करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decision to take a resolution for Medical college in Sindhudurg