हत्तींसाठी तिलारीत अधिवास करू - केसरकर

हत्तींसाठी तिलारीत अधिवास करू - केसरकर

दोडामार्ग - हत्ती समस्येने बेजार झालेल्या केर गावाला वित्त व गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट देत लवकरच हत्तींसाठी तिलारी धरणाच्या बाहेरील क्षेत्रात हत्तीसाठी अधिवास तयार करण्याची ग्वाही देली. तोपर्यंत हत्तींना हूसकावून लावण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याबाबत वनविभागाला सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले. 

दोन महिन्यांपासून केरवासीय हत्तींच्या समस्येने बेजार झाले आहेत. केर व भेकुर्लीच्या परिसरात ठाण मांडून बसलेला टस्कर हत्ती थेट लोकवस्तीत येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घराबाहेर पडणेही मुश्‍किल झाले आहे. या हत्तीने दोन वेळा एसटी बसही अडविली. त्यामुळे टस्कर हत्तीची दहशत केरवासीयांच्या मनात घर करून राहिली आहे. यापूर्वी केरवासीयांनी आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता.

या पार्श्‍वभूमीवर केरवासीयांशी संवाद साधण्यासाठी श्री. केसरकर यांनी केरला भेट दिली. यावेळी वनसंरक्षक समाधान चव्हाण, सहाय्यक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक, शिवसेनेचे दोडामार्ग तालुका प्रमुख बाबूराव धुरी, उपजिल्हाप्रमुख गणेश प्रसाद गवस, पंचायत समिती सभापती संजना कोरगावकर, केरच्या सरपंच मिनल देसाई, साटेली-भेडशी सरपंच लखू खरवत, माजी सरपंच प्रेमानंद देसाई आदी उपस्थित होते. 

केर गावातील चव्हाटा मंदिरात त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी उपसरपंच महादेव देसाई यांनी केरवासीयांच्या हत्ती समस्यांचा पाढा मंत्री केसरकरांसमोर वाचला व हत्तींच्या उपद्रवापासून कायमची सुटका करण्याबाबतचे निवेदन दिले. अनिर्णित क्षेत्र व वनसंज्ञा प्रश्‍न निकाली काढण्याची मागणी केली. 

बुडीत क्षेत्राबाहेरील जंगलात अधिवास.... 
पालकमंत्री म्हणाले, हत्तींसाठी तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेरील जंगलात अधिवास तयार केला जाणार आहे. त्यासाठी हत्तींना लागणाऱ्या खाद्याची लागवड त्याठिकाणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र सद्यस्थितीत हत्तींना हुसकावून लावण्यासाठीच्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. शिवाय सौरऊर्जा कुंपणही देण्याबाबत सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. 

कामांचा आढावा घेणार 

केसरकर म्हणाले, हत्तींना हुसकावून लावण्यासाठीच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना वन विभागाला दिल्या आहेत. याबाबत 20 दिवसानंतर पुन्हा केरमध्ये येऊन झालेल्या कामाचा आढावा घेतला जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com