
दीपक केसरकर म्हणाले, मीच उठवलेल्या लाटेमुळे विनायक राऊत खासदार
'मातोश्रीवर टीका करणं थांबेल, तेव्हाच राणेंसोबतचा वाद संपेल'
सावंतवाडी - नारायण राणे यांच्याशी माझा कधीच वैयक्तिक वाद नव्हता. त्यामुळे ते त्यांच्या कामाची पद्धत बदलतील आणि मातोश्रीवर टीका करण्याचे थांबतील, तेव्हा त्यांचा आणि माझा वाद संपलेला असेल, अशी स्पष्टोक्ती शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी दिली. खासदार विनायक राऊत यांच्यामुळे मला मंत्रिपद मिळाले असते तर मी त्या खुर्चीवर बसलोच नसतो. आम्हीच उठविलेल्या लाटेवर निवडून येऊन जर उपकारांची जाण नसेल तर आमदारकी आधी खासदारकीची निवडणूक येते, हे त्यांनी ध्यानात ठेवावे, असा इशाराही त्यांनी राऊत यांना दिला.
राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर प्रथमच शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर येथे दाखल झाले. त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘मी जो निर्णय घेतला तो जनहितासाठी आहे. माझे माझ्या पक्षावर प्रेम असले तरी बांधिलकी ही माझ्या भूमीशी आहे. त्यामुळे ज्यांनी निवडून दिले, त्या जनतेची कामे अर्धवट राहिली तर त्यांना काय उत्तर द्यायचे, याच विचाराने हा निर्णय घेतला. मी आयुष्यभर ज्यांना मदत केली, तेच लोक माझ्याविरोधात घोषणा देत असतील तर मनाला वाईट वाटणार; मात्र या सगळ्यांची उत्तरे मी जाहीर सभेत देणार आहे. तेथे मी माझी बाजू लोकांसमोर ठेवणार आहे. माझी बाजू खरी असल्यास जनता माझ्यासोबत राहील; अन्यथा ते त्यांचा मार्ग पकडतील.
आज माझ्यासोबत या, असे मी कोणाला सांगणार नाही. कारण त्यांची पदे काढली जातील; मात्र असेही काही लोक आहेत की ते कोणतीही अपेक्षा न करता माझ्यासोबत नक्कीच येतील. त्यामुळे गेली अनेक वर्षे कार्यकर्ते म्हणून माझ्यासोबत काम केलेल्यांनी माझ्याविरोधात घोषणा देण्यापेक्षा जनतेची सेवा आणि काम करावे.’
ते म्हणाले, ‘नारायण राणे आणि माझ्यात कधीच वैयक्तिक वाद नव्हते. वैचारिक वाद होते. त्यामुळे आजही त्यांनी त्यांच्या कामाची पद्धत बदलावी तसेच उठसूट मातोश्री व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे सोडावे. ज्या दिवशी ते हे करतील, त्यावेळी त्यांच्यातील आणि माझ्यातील वाद संपलेला असेल. आज माझ्यामुळे राणेंचे मंत्रिपद जाईल,’ असे खासदार राऊत म्हणत आहेत; मात्र माझ्यामुळे कोणाचे मंत्रिपद जावे, अशी माझी अपेक्षा नाही. त्यांच्यामुळे मला मंत्रिपद मिळाले असे ते म्हणत असतील तर कधीच मी त्या खुर्चीवर बसलो नसतो.
मुळात मीच उठवलेल्या लाटेवर ते निवडून आले. त्यामुळे माझ्यावर टीका करण्यापेक्षा आमदारकी आधी खासदारकीची निवडणूक येते, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. उद्या दोन्ही सेना एकत्र आल्यास खासदार राऊत कुठल्या तोंडाने माझ्याकडे येतील. आज शिवसेनेच्या खासदारांनी राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत भाजपशीच घरोबा बरा असे सांगून भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौप्रदी मुर्म यांना पाठिंबा देण्याबाबत मांडलेले मत हे भविष्यातील एकीचे संकेत आहेत.’
केसरकर म्हणाले, ‘व्यक्ती म्हणून खासदार राऊत यांच्यावर मी टीका करणार नाही; परंतु त्यांना वाटत असेल की सावंतवाडीमध्ये आपला नातेवाईक आमदार व्हावा तर त्यांनी ते जरूर करावे. किंबहुना त्याची सुरुवातही त्यांनी या ठिकाणी केली आहे. ते आमचे नेते आहेत. कारण सत्तेच्या काळात मुख्यमंत्र्याच्या रोलमध्येच गेल्यासारखे ते वावरत होते. त्यामुळे त्यांना दुःख झाले असेल की आपल्याला वर्षा बंगल्यावर आता जागा राहिली नाही. जेवढा काळ त्यांनी सत्ता उपभोगली तेवढी उद्धव ठाकरे यांनीही उपभोगली नाही. त्यामुळे आमच्या मतदारसंघातील कामे आम्ही त्यांच्याकडे मांडत होतो; परंतु त्यांनी ती कधीच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली नाहीत. यांच्या याच वृत्तीला आमदार कंटाळले होते. म्हणूनच आज जो काही डावपेच महाराष्ट्रात घडून आला त्याला खासदारही तितकेच जबाबदार आहेत.’
मंत्रिमंडळाला मर्यादा
राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जास्तीत जास्त किती माणसांना कॅबिनेट मंत्री करावे, यावर मर्यादा घातली आहे. यामुळेच काहीसा मंत्रिमंडळ विस्तार लांबलेला आहे. शिंदे सरकार जनतेच्या हिताचे सरकार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील आणि एक शिवसैनिक म्हणून मी बाळासाहेबांचे विचार नक्कीच पुढे घेऊन जाणार आहे, असेही ते म्हणाले.
सावंतवाडीत १५ ला जाहीर सभा
मी घेतलेल्या निर्णयानंतर काही जण जनतेमध्ये गैरसमज पसरवीत आहेत; परंतु या सगळ्यांची उत्तरे मी १५ जुलैला जाहीर सभेतून देणार आहे. सावंतवाडीमध्ये जाहीर सभा होणार असून ज्याला कोणाला या सभेमध्ये उपस्थित राहायचे असेल ते राहू शकतात, असेही केसरकर त्यांनी यावेळी सांगितले.