भाजपकडून रत्नागिरीत नगराध्यक्षपदासाठी 'यांना' उमेदवारी

Deepak Patvardhan Candidate From BJP For Ratnagiri City President Election
Deepak Patvardhan Candidate From BJP For Ratnagiri City President Election

रत्नागिरी - येथील नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिपक पटवर्धन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी त्यांचे नाव सुचवले असून त्यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणुक लढविली जाईल, असे भाजपचे कोकण प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.

येथील भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार निरजंन डावखरे, नीलेश राणे, अ‍ॅड. दिपक पटवर्धन, अशोक मयेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. लाड म्हणाले, भाजपकडून पटवर्धन, राजू कीर, राजेश सावंत यांची नावे होती. ती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभा गटनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे ठेवली. पटवर्धन यांचे नाव माजी खासदार नीलेश राणेंनी सुचविले असून त्याला सर्वांनी पसंती दिली. माजी आमदार बाळ माने लंडनला असून त्यांचाही पटवर्धन यांना पाठींबा आहे. त्यांच्याशीही दुरध्वनीवरुन चर्चा झाली असून ते दोन दिवसात रत्नागिरीत येणार आहेत. 12 नोव्हेंबरला अर्ज दाखल करण्याबाबत निर्णय होईल.

या प्रश्नामुळे रत्नागिरीतील नागरिकात संताप

पाणी योजनेतील भ्रष्टाचार, रस्त्यांना पडलेले खड्डे, विकासाचे धोरण नसलेली महाविकास आघाडीचे राज्य यामुळे रत्नागिरीतील नागरिक संतापलेले आहेत. त्यामुळे अ‍ॅड. पटवर्धन यांनाच नगराध्यक्ष करायचं असे आम्ही ठरवलय. अशी नागरिकांचीच मागणी आहे. भिवंडी, सोलापूरप्रमाणेच येथेही चमत्कार घडवण्यासाठी सज्ज आहोत. रत्नागिरीची पोटनिवडणुक लादलेली असून राहूल पंडित चांगले काम करत होते. त्यानंतर प्रभारी म्हणून काम करताना शिवसेनेचे बंड्या साळवी अयशस्वी ठरले. विकासनिधी परत पाठवयाचा असा एक कलमी कार्यक्रम त्यांनी केला. त्यांच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. भाजपचा उमेदवार चारित्र्यवान आहे, सत्तेत असताना भाजपने केेलेली कामे आणि केलेला विकासाचा प्रयत्न, नारायण राणेंचा लोकसंपर्क, नीलेश राणेंचा लोकसभेवेळचा अनुभव या जोरावर आम्ही निवडणूकीत उतरलो आहोत. लोकांना पर्याय नव्हता, तो आम्ही पटवर्धन यांच्या रुपाने दिला आहे आणि ते नक्कीच निवडून येतील.

शिवसेनेचा उमेदवार कोण तर बंड्या

जे सोबत येतील त्यांना घेऊन आम्ही लढणार आहोत. जनतेला अपेक्षित काम आम्ही करुन दाखवू. भाजपच्या नियमानुसार या निवडणुकीत प्रयत्न करु. आमदार सामंतांसह अन्य लोकांनी केलेली कामे जनतेला मान्य नाहीत. आतापर्यंत जनतेला गृहीत धरुन, एकाधिकारशाही सुरु होती. ती मोडीत काढणार असून दर्जेदार उमेदवाराची गरज भाजपने पूर्ण केली. शिवसेनेचा उमेदवार कोण तर बंड्या. नावातच दम नाही, तर कामात दम कसा येणार असा प्रश्‍न उपस्थित करत नीलेश राणेंनी पटवर्धन नगराध्यक्ष होतील असा विश्‍वास व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com