esakal | जंगलतोड, नासधूस चिंताजनक
sakal

बोलून बातमी शोधा

tree theft

जंगलतोड, नासधूस चिंताजनक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंडणगड ः तालुक्यातील जंगलतोड आणि जंगलाची नासधूस चिंताजनक असून, जैवविविधतेला नुकसानकारक ठरत आहे. तालुक्यात अवैध वृक्षतोड हा मोठ्या प्रमाणावर उलाढाल होणारा व्यवसाय बनून गेला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आणि बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी राज्य सरकारने वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा केला; परंतु अपुरे मनुष्यबळ व खात्याच्या दुर्लक्षामुळे वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होत नाही. वृक्षतोडीला परवानगी देताना कायद्यामध्ये पुनर्लागवडीची महत्त्वाची अट आहे तिच्याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. परिणामी वृक्षतोड होते पण नवीन झाडे लावली जात नाहीत. त्यामुळे डोंगरच्या डोंगर उघडे-बोडके होत आहेत.

हेही वाचा: शरद पवारांच्या नावाने फेलोशिप

आजवर शासनाने वृक्षतोड थांबवणे आणि जंगलांची वाढ करणे यासाठी लाखो रुपये खर्चून वृक्षारोपण वृक्षसंवर्धन अशा उपाययोजना केल्या आहेत; मात्र मागील दहा वर्षांत अपेक्षित क्षेत्र वाढल्याचे आढळत नाही. त्यासाठी स्थानिक परिस्थितीला अनुरूप वृक्षारोपण, वृक्षारोपण केलेल्या रोपांची निगा प्रत्यक्षदर्शी राखणे, तसेच पावसाळ्यात आपोआप उगवलेल्या निसर्गनिर्मित झाडांचे संगोपन केले तर खूप खर्च वाचू शकेल. शिवाय वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणे, तसेच लागवड केलेल्या वृक्षांचे सातत्याने ग्रीन ऑडिट करणे आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने वनीकरणाचे, निसर्गाचे, पर्यायाने पर्यावरणीय परिस्थितीचे संवर्धन आणि रक्षण होईल. मात्र, तालुक्यात अशी परिस्थिती दिसून येत नाही. उलट विरोधाभास असून तोडलेले वृक्ष किट्या स्वरूपात महानगरांकडे पाठवले जात आहेत. ग्रामीण भागातील लोकांची उपजीविका प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वने व वन्य

उत्पादनावर अवलंबून असल्याचे दिसते. फळांसारखी लाकूड नसलेली वन उत्पादने हे तालुक्यातील सर्वांत मोठे असंघटित आर्थिक क्षेत्र बनले आहे. तालुक्यातील जैवविविधतेचा विनियोग कशारीतीने करण्यात येणार यावरती सर्वस्वी संवर्धन अवलंबून आहे. एका बाजूला वृक्षतोड तसेच दुसऱ्या बाजूला दरवर्षी हजारों एकर वनक्षेत्र आगीमुळे नुकसान होत आहे. जंगलांना हानी पोहोचल्यामुळे वन्यजीव, कीड-रोग आणि प्रतिकूल हवामान अशा बऱ्याच नैसर्गिक घटकांवर विपरीत परिणाम होऊन सजीवसृष्टीला बाधा पोहोचतेय.

वन्य प्राण्यांच्या उपद्रवाचे मूळ कारण;

उतारावरील जंगलांमुळे भूपृष्ठाची धूप रोखली जाते. झाडांची मुळे माती घट्ट धरून ठेवत असल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे होणारी धूप होण्याची प्रक्रिया थांबते. डोंगरावरील वृक्षतोडीमुळे मातीची धूप होत आहे. त्यामुळे वाहून येणाऱ्या गाळामुळे नद्यां, ओढ्यांची पात्रे उथळ बनत आहेत. त्याची पाणी धारणा क्षमताही कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात तालुक्यातील पाणी प्रश्न तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी-बागायतदार हैराण झाले आहेत, मात्र वन्यप्राण्यांच्या उपद्रवाचे मूळ कारण जंगलतोड हे आहे. जंगले ही प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास आहेत. अधिवासाच नष्ट होत असल्याने प्राणी लोकवस्तीच्या दिशेने सरकू लागले आहेत.

नेमके होतेय काय

  • वृक्षारोपण, वनसंवर्धन नावाला

  • पुनर्लागवडीला हरताळ

  • डोंगर होतात ऊघडे,बोडके

  • नद्या,ओहोळ गाळाने भरलेत

  • वन्यप्राण्यांच्या उपद्रवात वाढ

loading image
go to top