मंडणगड -पुणे मार्गे शिर्डी प्रवासाला विलंब

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जून 2019

मंडणगड -  मंडणगड आगाराच्या माणगाव ताम्हाणे पुणे मार्गे शिर्डी या मार्गावर सुरु असलेल्या लांब पल्याचा गाडीचा नेहमीचा मार्ग बदलण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. रस्ता सुरक्षा या विषयावर जागरूक असलेल्या आगारव्यवस्थापनाने याकडे पावसाला सुरुवात होण्यापूर्वी लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. यंदा पाऊस लांबल्याने अजुनही बदल करणे शक्‍य आहे.

ताम्हणी मार्गाने मंडणगड ते पुणे हे अंतर केवळ 160 किलोमीटर इतके होत असले तरी पुणे ते माणगाव या मार्गाचे फोर लेन कॉंक्रीटच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. यासाठी ताम्हाणी घाटापासून पुढील सुमारे चाळीस किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खोदून टाकण्यात आला. त्यामुळे 40 किमी अंतर कापण्यासाठी गाड्यांना 2 ते 3 तासांचा कालावधी लागतो. रस्त्यामध्ये ठिकठिकाणी डायव्हर्शन आहेत व उपलब्ध रस्त्यातही प्रचंड खड्डे आहेत. त्यामुळे सिंगल लेनवर एकाचवेळी दोन्ही बाजूने वाहतूक सुरु असल्याने या मार्गावरून प्रवास करणे त्रासाचे बनते.

कोथरूड मार्गे पुणे शहरात प्रवेश करतानाही पुणे मेट्रोचे कामामुळे चांदणी चौक बायपास ते कोथरुड हे सात किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तासांचा कालावधी जातो. ही बाब आगारव्यवस्थापनाने लक्षात घेणे गरजेचे आहे. 

पुणे मार्गावर मंडणगड आगारातर्फे एकमेव गाडी सुरु असली तरी येणाऱ्या पावसात नादुरुस्त रस्त्यावर पाणी साठल्याने दररोज या मार्गावर प्रवास करणाऱ्या गाड्यांची व त्यातून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना नेहमीच्या वेळेपेक्षा तीन ते चार तास अधिक खर्च करावे लागणार आहेत. मंडणगडकडून पुणे येथे जाण्यासाठी "भोर व महाबळेश्‍वर हे अन्य पर्यायी मार्गही उपलब्ध असल्याने ताम्हणी घाटाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत पर्यायी मार्गाने गाडी पुणे येथे नेण्याची मागणी होत असून आगार व्यवस्थापनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand of change in Mandangad - Pune - Shirdi bus route