रत्नागिरी : रेल्वेकडून भरपाईची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येथील रेल्वेस्थानकात ठेवलेल्या आंब्याच्या पेट्या.

रत्नागिरी : रेल्वेकडून भरपाईची मागणी

रत्नागिरी - येथील स्थानकातील आरक्षण अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हापूस रत्नागिरीतून दिल्लीत पाठवणे अद्यापही शक्य झालेले नाही. तीन दिवस झाले तरीही हापूसच्या पेट्या रत्नागिरी स्थानकामध्येच पडून आहेत. यामुळे २ लाख २४ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले असून, १५ दिवसांत त्याची भरपाई द्यावी, अन्यथा ग्राहक न्यायालयात दावा दाखल करावा लागेल, असे पत्र बागायतदार समीर दामले यांनी रत्नागिरी रेल्वेस्थानकप्रमुखांना दिले आहे. रेल्वेमधून हापूसची वाहतूक करावी यासाठी आग्रही भूमिका कोकणातील स्थानिक लोकप्रतिनिधींकडून वारंवार घेतली होती. यंदाच्या हंगामात तशी तयारीही रेल्वे प्रशासनाने केली. गेले काही वर्षे समीर दामले यांच्याकडून रत्नागिरी स्थानकातून रेल्वेमार्गे नवी दिल्लीला आंबा पाठवला जात आहे.

यंदाच्या हंगामात दोनवेळा त्यांनी काही आंबे नवी दिल्लीला रेल्वेमधून पाठवलेही; परंतु गुरुवारी (ता. २८) ३७४ किलो आंबे लाकडी पेटीमधून दिल्लीला पाठवण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकात पाठवले होते. पहिल्या दिवशी हजरत निजामुद्दीन गाडीत जागा नसल्याचे कारण देण्यात आले. शुक्रवारी राजधानी एक्स्प्रेसमध्ये अचानक दक्षिणेकडील रेल्वे स्थानकातून मालगाडीत मटण भरले होते. परिणामी रत्नागिरीतून आंबे पाठवण्यासाठी जागाच मिळालेली नाही. शनिवारीही उडवाउडवीची कारणे समीर दामले यांना देण्यात आली. सलग तीन दिवस आंबे जागेवरच राहिल्यामुळे ते खराब होण्याची शक्यता आहे. नाराज झालेल्या दामले यांनी पश्‍चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यासंदर्भात पत्र रत्नागिरीतील स्थानकप्रमुखांकडे सादर केले आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानक ते हजरत निजामुद्दीन (नवी दिल्ली) रेल्वे स्थानकापर्यंत पावती क्र. ३६४५८४ ने आंबे पाठविण्यासाठी आरक्षण केले होते; परंतु दुर्दैवाने आंब्याच्या पेट्या पाठविल्या नाहीत.

आंबा नाशवंत असल्यामुळे तो खराब होणार आहे. यामध्ये २ लाख २४ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत भरपाईची रक्कम मिळावी अन्यथा ग्राहक न्यायालयात किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे दावा दाखल करणार असे पत्रात नमूद केले आहे.

नवी दिल्लीला पाठविण्यात येणाऱ्या आंब्याच्या पेट्या गेले तीन दिवस रत्नागिरी स्थानकात पडून आहेत. हवामानातील बदलामुळे त्यातील आंबा खराब होणार आहे. याला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे.

- समीर दामले, आंबा बागायतदार.