झाराप - दोडामार्ग दरम्यान वैद्यकीय महाविद्यालय व्हावे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

सावंतवाडी - जिल्ह्यात उभारले जाणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे झाल्यास आमचा विरोध नाही; मात्र ते झाराप ते दोडामार्ग या मध्यवर्ती ठिकाणी व्हावे, या मागणीला प्राधान्य द्यावे. त्यासाठी जनरेटा सुरूच राहणार, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे समन्वयक ऍड. शामराव सावंत यांनी आज येथे दिली.

सावंतवाडी - जिल्ह्यात उभारले जाणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे झाल्यास आमचा विरोध नाही; मात्र ते झाराप ते दोडामार्ग या मध्यवर्ती ठिकाणी व्हावे, या मागणीला प्राधान्य द्यावे. त्यासाठी जनरेटा सुरूच राहणार, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे समन्वयक ऍड. शामराव सावंत यांनी आज येथे दिली. 

महाविद्यालयासाठी जमीन संपादनाबरोबर निधी व गती लवकरात लवकर मिळावी, यासाठी 15 ऑगस्टला प्रांताधिकारी कार्यालयासमोर कृती समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

येथील शासकीय विश्रामगृहावर कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ऍड. सावंत बोलत होते. यावेळी सी.ए. लक्ष्मण नाईक, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, हेलन निब्रे आदी उपस्थित होते.

ऍड. सावंत म्हणाले, ""शासनाने राज्यात सात ठिकाणी शासकीय महाविद्यालय उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तिसरा नंबर आहे; मात्र याबाबत अधिकृत लेखी माहिती नसली तरी महाविद्यालय होणार, याबाबत आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत ठोस आश्वासन व कार्य सुरू होत नाही, तोपर्यंत आमचे प्रयत्न सुरू राहणार आहेत. पत्राच्या मोहिमेतंर्गत मुख्यमंत्र्यांना 25 हजार पत्रे पाठवण्यात आली असून त्यामध्ये सावंतवाडी 10 हजार, वेंगुर्ले 8 हजार, व दोडामार्गातून 7 हजार पत्रांचा समावेश आहे.'' 

श्री. सावंत पुढे म्हणाले, ""जिल्ह्यात होणारे वैद्यकीय महाविद्यालय सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ अशा मध्यवर्ती ठिकाणी व्हावे, अशी आमची मागणी आहे. ते जिल्ह्याच्या ठिकाणी झाल्यास आमचा कोणताही विरोध नाही. पडवे माजगाव येथे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे हॉस्पिटल आहे. त्यामुळे त्या भागातील लोकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात होणारे महाविद्यालय झाराप ते दोडामार्ग या मध्यवर्ती ठिकाणी झाल्यास येथील लोकांना वैद्यकीय सुविधा मिळू शकेल. यासाठी आमचा प्रयत्न आहे.'' 

राजकीय टीकेला आम्ही उत्तर देणार नाही 
सह्यांची मोहीम किंवा पत्रे पाठवून शासकीय महाविद्यालय होत नाही, या पालकमंत्री केसरकर यांच्या वक्तव्याबाबत यांना विचारले असता, कुठल्याही राजकीय टीकेला आम्ही उत्तर देणार नाही. केसरकर यांनी त्यांचे प्रयत्न करावेत, आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवणार. नजिकच्या गोवा राज्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यात आरोग्य सुविधा सक्षम करणे हाच आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय होणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand of Medical college in Zharap Dodamarg by Ad. Shamrao Sawant