ते गेले 'त्या' जहाजावरील कोरोनाबाधित रुग्णांचे साहित्य नष्ट करायला अन्...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

जहाजावरील रुग्ण ; पाच जणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी - जयगड पोर्टवर आलेल्या प्रिया-23 या जहाजावरील कोरोना बाधित रुग्णांच्या साहित्यासह जहाजावरील अन्य साहित्य घेऊन रत्नागिरी-शिरगाव येथे त्याची विल्हेवाट लावणाऱ्या पाच जणांविरुद्ध शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामविकास अधिकारी वासुदेव शामराव सावके यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार समीर कादर खान (बाजारपेठ रत्नागिरी), अस्लम इस्माईल कर्लेकर, फकीर महंमद अली पांजरी, सिकंदर हसंमिया पटेल (सर्व रा.साखरतर) आणि मिलिंद तुकाराम बनप (रा.घाणेकर आळी) या पाच संशयिताविरुद्ध तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 (ब) आदी कलमान्वये दाखल केले आहे. शनिवारी 27 जून ला परटवणे ते साळवी स्टॉप जाणाऱ्या रोडवर हा प्रकार घडला.

वाचा - केंद्र सरकारने वाढविले पेट्रोलचे दर अन् राष्ट्रवादीने काढला बैलगाडी मोर्चा

टेम्पो (एम.एच .08 / एपी / 0645) या वाहनावरील चालक समीर खान व त्याच्या सोबत असणाऱ्या चौघांनी जाणीवपूर्वक आंग्रे पोर्ट जयगड येथील प्रिया -23 या जहाजावरील कोविड -19 या विषाणूने संक्रमित असलेल्या इसमांचे तसेच सदर जहाजावरील इतर साहित्य डिस्पोजल (नष्ट) करण्यासाठी आणले. साहित्य हाताळून नष्ट करण्यासाठी फिनोलेक्‍स कॉलनी ते अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडे जाणाऱ्या रोडच्या दक्षिणेस असलेल्या मोकळ्या जागेत टाकण्यास आणले.संसर्ग पसरण्याचा धोका त्यामुळे निर्माण होईल, हे माहित असताना जिल्हाधिकारी यांनी लागू केलेला मनाई आदेश डावलल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: destroyed the material of the corona Patient Five people have been charged