रस्ता भूमिपुजनावरून शिवसेना- भाजपमध्ये बांद्यात चढाओढ 

निलेश मोरजकर
Thursday, 4 March 2021

दोन्ही पक्षांनी केलेल्या शुभारंभामुळे मात्र शहरवासीय संभ्रमात पडले. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याच माध्यमातून रस्त्याचे काम मंजूर झाल्याचा दावा केला आहे. 

बांदा (सिंधुदुर्ग)-  शहरातील श्री बांदेश्‍वर मंदिर ते कट्टा कॉर्नर या 900 मीटर लांबीच्या 25 लाख रुपये मंजूर असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रारंभ आज भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ एका तासाच्या फरकाने केला. भाजपकडून ज्येष्ठ कार्यकर्ते देवानंद कुबल तर शिवसेनेच्यावतीने खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. दोन्ही पक्षांनी केलेल्या शुभारंभामुळे मात्र शहरवासीय संभ्रमात पडले. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याच माध्यमातून रस्त्याचे काम मंजूर झाल्याचा दावा केला आहे. 

आज सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदच्या जिल्हा नियोजन निधीतून नागरी सुविधा योजनेंतर्गत शहरातील शिवाजी चौक ते बांदेश्‍वर तिठा दरम्यान 900 मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रारंभ भाजपचे कुबल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्या श्‍वेता कोरगावकर, उपसरपंच हर्षद कामत, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, मकरंद तोरसकर, श्‍यामसुंदर मांजरेकर, अंकिता देसाई, मंगल मयेकर, किशोरी बांदेकर, समिक्षा सावंत, सुनील माजगावकर, शहर अध्यक्ष राजा सावंत, अवंती पंडीत, सुनील धामापूरकर, अण्णा पाटकर, प्रसाद बांदेकर, सर्वेश मुळ्ये, गौरव गवंडे, शिवप्रसाद बांदेकर, श्रीधर सावंत आदी उपस्थित होते.

दरम्यान, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत श्री. पडते यांनी श्रीफळ वाढवून कामाचा प्रारंभ केला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी पंचायत समिती सदस्य बबन राणे, ग्रामपंचायत सदस्य राजेश विर्नोडकर, वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे, सागर नाणोस्कर, पिंट्या गायतोंडे, अक्षय नाटेकर, पांडुरंग नाटेकर, ओंकार नाडकर्णी, ज्ञानेश्‍वर येडवे, मुकुंद येडवे, भाऊ वाळके आदींसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. 

या डांबरीकरणासाठी भाजपच्या अधिपत्याखाली असलेल्या ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. शहरातील नियोजित विकासकामांसाठी भाजप नेहमीच प्रयत्नशील असून भविष्यात शहरातील अनेक विकासकामांची भूमिपूजने करण्यात येणार आहेत. 
- अक्रम खान, सरपंच 

पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून बांद्यात श्री बांदेश्‍वर मंदिर ते कट्टा कॉर्नर या रस्त्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या कामाचा शिवसेनेकडून प्रारंभ झाला. 
- साईप्रसाद काणेकर, ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहरप्रमुख 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: development work issue politics shiv sena bjp banda konkan sindhudurg