esakal | "हापूस' हवाय! मागवा आता ऑनलाईन; नोंदणीसाठी 'या; बेबसाईटचा करा वापर

बोलून बातमी शोधा

"हापूस' हवाय! मागवा आता ऑनलाईन; नोंदणीसाठी 'या; बेबसाईटचा करा वापर
"हापूस' हवाय! मागवा आता ऑनलाईन; नोंदणीसाठी 'या; बेबसाईटचा करा वापर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) : कोरोना प्रादुभार्वामुळे सर्वच व्यवहार ठप्प असले तरी कोकणातील हापूस आंबा ग्राहकांना ऑनलाइन माध्यमातून खरेदी करता येणार आहे. खरेदी आंबा थेट घरपोचही उपलब्ध होणार आहे. तर आंबा उत्पादकांनाही ऑनलाइन माध्यमातून ग्राहकांना हापूस आंब्याची विक्री करता येणार आहे. त्यासाठी कृषी पणन मंडळाने पुढाकार घेतला असून आंबा खरेदी-विक्रीसाठी संकेतस्थळ उपलब्ध केले आहे.

हापूस आंबा ग्राहकांना ऑनलाइन पोर्टलव्दारे आपली मागणी थेट शेतकऱ्यांकडे नोंदण्यासाठी कृषी पणन मंडळाने www.msamb.com हे संकेतस्थळ उपलब्ध केले आहे. या संकेतस्थळावरील buyers sellers information लिंकद्वारे सर्वप्रथम ग्राहकांनी नोंदणी करावयाची आहे. त्यानंतर आंबा उत्पादकांची माहिती ग्राहकांना मिळणार आहे. राज्य कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षी कोकणातील हापूस आंबा शहरातील ग्राहकांना थेट कोकणातील उत्पादकांद्वारे उपलब्ध व्हावा यासाठी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते; मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आंबा महोत्सव आयोजन करणे शक्‍य झाले नाही. कोकणातील आंबा उत्पादकांना विक्रीसाठी शहरात यावे लागू नये तसेच शहरातील ग्राहकांनाही घराबाहेर किंवा सोसायटीबाहेर पडावे लागू नये यासाठी उत्पादक व ग्राहक या दोघांनाही ऑनलाइन पोर्टलद्वारे आंबा खरेदी- विक्रीची माहिती देण्यात आली आहे.

किमान मर्यादा 100 डझन

कृषी पणन मंडळाने आपल्या पोर्टलवर कोकणातील हापूस आंबा उत्पादकांची नोंदणी सुरू केली आहे. त्यात आंबा उत्पादकाचे नाव, संपर्क क्रमांक, आंबा उपलब्ध तपशील आदी माहिती पोर्टलवर असेल. तर पुणे, मुंबई तसेच राज्यातील इतर शहरातील वैयक्तिक ग्राहक अथवा सहकारी गृहनिर्माण संस्था आदींना मागणी सदर पोर्टलवर नोंदविता येईल. विशिष्ट आंबा उत्पादकांशी संपर्क साधता येईल. त्यानंतर आंबा खरेदीबाबत तातडीने कार्यवाही करून शहरातील ग्राहकांना त्यांच्या घरी आंबा पोहोच करू शकतील. आंबा खरेदीसाठी किमान मर्यादा 100 डझन असेल.

Edited By- Archana Banage