देवगड : भातावर करपा रोगाच्या प्रादुर्भावाची भीती

पावसाची पाठ; पिके धोक्यात
 rice crop
rice cropsakal

देवगड : अनियमित पाऊस, भात बियाण्याच्या उगवण क्षमतेमधील काहीशी कमतरता यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. पाऊस नसल्याने कातळावरील भातशेतीवर करपा रोगाच्या प्रादुर्भावाची चाहूल दिसू लागली आहे. भातरोपांची लावणी लावून बराच कालावधी उलटला, तरीही अपेक्षित प्रमाणात भातशेतीत वाढ झाली नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. सध्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली असल्याने भातशेतीला सध्याचे हवामान मारक ठरण्याची लक्षणे आहेत.

कोकणातील शेतकऱ्यांचा भातशेती हा पूर्वापार व्यवसाय आहे. मिरगापासून भरपूर पाऊस ही भातशेतीच्या दृष्टीने जमेची बाब होती. केवळ भातशेतीच नाही, तर नाचणी, कुळीथ यासह विविध कडधान्ये पिकवण्याकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष असे.

वर्षाकाठी लागणारे भात पिकवण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी कायमच खटाटोप करीत आला आहे. भातशेतीच्या जोडीला भाजीपाला उत्पादन घेतले जात होते. यथावकाश शेतीला पूरक म्हणून बागायती निर्माण होऊ लागल्या. तरीही ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे आजही शेती करताना दिसतात. अलीकडे शेतीला आधुनिकतेची जोड मिळाली आहे. त्यामुळे जलद शेती करण्याकडे कल असतो. कमी मनुष्यबळात शेतीची कामे करण्याची सोय झाली. याबरोबरच पारंपरिक बियाण्यांची जागा आधुनिक बियाण्यांनी घेतली. त्यामुळे भरपूर भात उत्पादन घेण्याकडे कल वाढला.

विविध शेती स्पर्धांमध्ये शेतकरी सहभागी होऊ लागला. भात विक्री करून अपेक्षित नफाही कमवू लागला. मात्र, अलीकडे ग्लोबल वॉर्मिंगचे पडसाद भातशेतीला जाणवू लागले आहेत.

हवामान बदलाचा फटका एकूणच हंगामावर दिसू लागला आहे. पूर्वी पाऊस काही ठराविक कालावधीत पडत असल्याने भातशेतीचे नियोजन ठरलेले असे; मात्र आता अवेळी पाऊस पडत असल्याने शेतीमधील अडचणी वाढू लागल्या आहेत. यंदा मान्सूनचे आगमन तुलनेने उशिरा झाले. त्यातच गेल्या काही दिवसांत पावसाने ओढ दिली आहे. कडक ऊनाच्या झळा बसू लागल्या आहेत. एकीकडे काही प्रमाणात भाताला ऊनाची आवश्यकता असते; मात्र सध्याच्या वाढत्या उकाड्याने शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.

तालुक्यातील बहुतांशी भाग कातळाचा असल्याने काही ठराविक दिवसांत पाऊस न झाल्यास शेती अडचणीत सापडते. असेच काहीसे चित्र आता दिसत आहे. भात लावणी वेळीच उरकली, तरीही अद्याप भात रोपांची म्हणावी तशी वाढ होताना दिसत नाही, असा शेतकर्‍यांचा अनुभव आहे. भातशेतीप्रमाणे भाजीपाला उत्पादनही कमी होत असल्याचे चित्र आहे. बियाण्यांमधील उगवण क्षमतेतील कमतरता कारणीभूत असावी, असा अंदाज आहे. काहीही असले तरीही पावसाने भातपीक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

पावसाने ओढ दिल्याने भातपीक अडचणीत येऊ शकते. काही भागात भातपिकावर आता करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. याचे प्रमाण कमी असले, तरीही पाऊस असाच लांबल्यास अडचणी वाढू शकतात. सोय असलेल्या शेतकऱ्यांनी भातशेतीला पाणी देण्याची आवश्यकता आहे. शेतीसाठी आवश्यक काळजी घेतली पाहिजे.

- एच. एस. उल्फे, कृषी अधिकारी, देवगड

यंदा पाऊस शेतीसाठी बरा आहे. काही वेळा शेतीसाठी ऊनही आवश्यक असते. मात्र, पाऊस नसल्याने कातळी भागातील शेतीवर आता करपा रोग जाणवू लागला आहे. सुरुवातीला लावलेल्या रोपांची वाढ खुंटलेली दिसते. बियाण्यांमधील उगवण क्षमतेतील काही त्रुटी असाव्यात, असे वाटते. भाजीपाल्याचे बियाणे अपेक्षित जोर धरत नसल्याचे दिसते.

- बबन बोडेकर, शेतकरी, दाभोळे-कोंडामा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com