देवगडची विरोधी बाकाची परंपरा कायम

Devgad Tradition MLA Always In Opposition
Devgad Tradition MLA Always In Opposition

देवगड ( सिंधुदुर्ग ) - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापित झाले आणि तत्कालीन देवगड विधानसभा मतदार संघापासूनची मध्यंतरीचा युतीची साडेचार वर्षाचा कालखंड वगळता गेली सुमारे 30 वर्षे राहिलेली विरोधी आमदाराची परंपरा कायम आहे. सत्तेतील आमदार स्थानिक विकासासाठी पोषक असल्याचे मानले जाते; मात्र देवगडवासियांची सुप्त इच्छा यावेळी सत्तेच्या समीप जावूनही सत्यात उतरली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हा मतदारसंघ विरोधी बाकावरच राहिला आहे.

सुरुवातीची काही वर्षे वगळता साधारणपणे 1985 पर्यंत तत्कालीन देवगड विधानसभा मतदार संघात सत्ताधारी आमदार लाभला. पुढे 1985 मध्ये अप्पासाहेब गोगटे आमदार झाले आणि सत्तेच्या विरोधातील आमदार अशी परंपरा सुरु झाली; परंतु 1995 मध्ये आलेल्या भाजप -शिवसेना युती शासनाच्या काळात ही परंपरा काहीशी खंडीत झाली. युतीच्या सुमारे साडेचार वर्षाच्या कालखंडात अनेक विकासात्मक कामे मार्गी लागली. मिठबांव-हिंदळे, गढीताम्हणे, तिर्लोट -आंबेरी तसेच शिरवली असे महत्त्वाचे पूल अप्पासाहेब गोगटे यांच्या प्रयत्नाने झाले. तळेबाजार वीज उपकेंद्र, आयटीआय इमारत, देवगड -जामसंडे गावासाठी दहिबाव येथील पुरक नळयोजनाही मार्गी लागली; मात्र 1999 पासून पुन्हा विरोधी आमदार परंपरा सुरू राहीली.

नीतेश राणे विरोधी आमदारच 

अप्पासाहेब गोगटे यांच्यानंतर माजी आमदार ऍड. अजित गोगटे यांनीही विरोधी आमदार म्हणूनच काम केले. पुढे विस्तारित झालेल्या कणकवली मतदार संघातून भाजपच्या प्रमोद जठार यांनी विजय मिळवला खरा; पण तेही विरोधी बाकावरचे आमदार ठरले. 2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आले; पण येथील आमदार नीतेश राणे विरोधी आमदार म्हणून कार्यरत राहिले. चालूवर्षी नीतेश राणे यांनी भाजप प्रवेश करुन पुन्हा एकदा विजय संपादन केला. निवडणूक निकालानंतर प्रथमदर्शनी भाजप आणि शिवसेना युतीचे संख्याबळ पहाता युती सत्तेत येईल असे चित्र होते. त्यामुळे येथील आमदाराचे विरोधी बाकावर बसण्याचे ग्रहण सुटून मतदारसंघाला सुगीचे दिवस येतील असे वाटत असतानाच मतदार संघाचे दुर्दैव आड आले.

अपेक्षित विकासाचे स्वप्न मात्र अधुरेच

राज्यात भाजपला बाजुला ठेवत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि सर्व आशा आकांक्षावर पुन्हा एकदा पाणी फिरले. आज केंद्रात भाजपचे सरकार आहे. राज्यातही युतीचे सरकार सत्तेत आले असते तर पर्यायाने येथील आमदार सत्ताधारी झाला असता. त्यामुळे विरोधीपणातून सुटका होऊन काहीतरी नवीन घडले असते; परंतु महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेमुळे वेगवान आणि अपेक्षित विकासाचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले. आता विकासासाठी विरोधी बाकावर बसून झगडावे लागणार आहे.

सोशल मिडिया तापतोय...

राज्यातील सत्ता स्थापनेबाबत मार्मिक भाष्य करणारे राजकीय वाकःयुद्ध सध्या सोशल मिडियावर सुरु आहे. यामुळे सोशल मिडियावरील राजकीय धग रणरणत आहे. यातूनच आपापसात जुंपण्याची चिन्हे आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com