esakal | Devrukh : खड्डेच चोहीकडे; प्रवाशांचे मोडले कंबरडे
sakal

बोलून बातमी शोधा

devrukh

Devrukh : खड्डेच चोहीकडे; प्रवाशांचे मोडले कंबरडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवरूख : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचे स्वागत अपेक्षेप्रमाणेच खड्ड्यांतून झाले आहे. यावर्षीही चौपदरीकरणाचे काम करताना खड्डे बुजविण्याचे सौजन्य न दाखविल्याने चाकरमान्यांची हाडं खिळखिळी होत आहेत. चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर खड्ड्यांमध्ये वाढच होते आहे. याकडे ना राष्ट्रीय महामार्ग विभाग लक्ष देते, ना संबंधित ठेकेदार.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण २०१५ पासून सुरू झाले. त्या आधीपासूनच दरवर्षीच्या पावसाळ्यात महामार्गावर पडणारे खड्डे हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय होता. चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर तरी हे खड्डे कमी होतील, अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली आहे.

हे खड्डे किती धोकादायक ठरतात, याचा प्रत्यय चार वर्षांपूर्वी आला होता. संगमेश्‍वर जवळच्या धामणी यादववाडी नजीक पडलेल्या खड्ड्यात आपटून एक तवेरा गाडी थेट असावी नदीत पडली होती. यात चारजणांचा जीव गेला होता. त्या वेळी या रस्त्याचे काम एमइपी (मुंबइ एन्ट्री पॉईंट) या कंपनीकडे होते. या अपघातानंतर सर्व राजकीय पक्षांनी या कंपनीचे स्थानिक कार्यालय फोडले होतेत्यानंतर एकच वर्ष महामार्ग खड्डयांविना राहिला होता; मात्र त्यानंतरची स्थिती जैसेथेच आहे.

हेही वाचा: डोली-पालखीत विराजमान होऊन रत्नागिरी,सिंधुदुर्गात बाप्पाचे आगमन

कुठला चुकवू आणि कुठला नको..

यावर्षी संगमेश्‍वर तालुक्यातील आरवली ते बावनदी या अपघातप्रवण क्षेत्रात खड्ड्यांमध्ये आकंठ बुडाला आहे. तुरळ ते धामणी तर न बोलण्यासारखी अवस्था आहे. यामुळे कुठला खड्डा चुकवू आणि कुठला नको, अशी स्थिती आहे. सध्या सुरू असलेला पाऊस याला आणखी कारणीभूत ठरला आहे. दिवसा हे खड्डे दिसतात, तरी रात्रीच्या वेळी रस्त्यावरील पाण्यामुळे खड्डयांचा अंदाजच येत नसल्याने वाहनचालक बावरत आहेत.

मोठ्या वाहनांना त्रास कमी

खासगी बस, एसटी किंवा त्यापेक्षा मोठी वाहने यांना या खड्डयांचा त्रास कमी होतो. मात्र, चारचाकी, तीन चाकी आणि दुचाकीस्वारांना याचा मोठा त्रास होत आहे. यातून मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. संबंधित विभाग, ठेकेदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

एक नजर

  1. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण २०१५ पासून सुरू

  2. दरवर्षी पावसाळ्यात महामार्गावर पडतात खड्डे

  3. यादववाडीजवळील खड्ड्यात झाला होता भीषण अपघात

  4. आरवली ते बावनदी खड्ड्यांमध्ये आकंठ बुडाला

  5. तुरळ ते धामणी मार्गाची न बोलण्यासारखी अवस्था

loading image
go to top